कोविड रुग्ण संख्या घटतेय, मृत्यूचा आकडा वाढतोय

मुंबईत शनिवारी दिवभरात जिथे ३६५ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे रविवारी दिवसभरात ३५४ रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात ७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर कोविड चाचण्यांची संख्या जिथे ४८ हजारांवर असायची, तिथे रविवारी ३० हजार चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे कमी झालेल्या चाचण्यांमुळे रुग्णसंख्या घटलेली पाहायला मिळत असली, तरी मृत्यूचा वाढलेला आकडा हा चिंतेचा विषय आहे.

(हेही वाचाः आर्थिक कचाट्यात सापडलेल्या एसटीचे विलीनीकरण करा… संघटनेची मागणी)

अशी आहे आकडेवारी

शुक्रवारी ४९ हजार ९२१ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ४४१ रुग्ण आढळून आले होते. तर शनिवारी ३५ हजार ८५१ कोविड चाचण्या करण्यात आल्यानंतर ३६५ नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी २९ हजार ८४९ चाचण्या केल्यानंतर ३५४ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. रविवारी दिवसभरात १८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आणि ७ रुग्णांचा मृत्यू झाला. या मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ५ रुग्ण दीर्घकालीन आजारी होते. यामध्ये ४ पुरुष आणि ३ महिला रुग्णांचा समावेश आहे. यातील एक रुग्ण हा चाळीशीतील असून, चार रुग्णांचे वय हे साठीपार आहे. उर्वरित दोन रुग्णांचे वय हे ४० ते ६० वयोगटातील आहे. बरे झालेल्या रुग्णांचा दर हा ९७ टक्के आहे असून, मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १२१० दिवस एवढा आहे. झोपडपट्ट्या आणि चाळी या पुन्हा कोरोनामुक्त झाल्या आहेत. दिवसभरात एकही नवीन झोपडपट्टी, चाळीची नोंद सक्रिय कंटेन्मेंट झोनमध्ये झाली नसून, ही संख्या शून्यावर आहे. तर रविवारी सीलबंद असलेल्या इमारतींची संख्या ४० एवढी आहे.

(हेही वाचाः सकारात्मक बातमी! राज्यात नवीन रुग्णांच्या संख्येत बरीच घट!)

मागील ५ दिवसांमधील रुग्ण संख्या आणि मृत्यूचा आकडा

रविवार १२ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३५४, मृत्यू -७

शनिवार ११ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ३६५, मृत्यू -४

शुक्रवारी १० सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४४१, मृत्यू -५

गुरुवारी ९ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ४५८, मृत्यू-६

बुधवार ८ सप्टेंबर २०२१ : रुग्ण- ५३०, मृत्यू -४

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here