वरळीतच वाढणार ३५० ते ४०० आयसीयू बेड्स!

अशाप्रकारे सुविधा वाढवण्यावर भर देऊन स्थानिक रहिवाशांची गैरसोय होणार नाही, यावर अधिक लक्ष दिले जात आहे.

ज्या वरळी, प्रभादेवी भागात एकही खासगी रुग्णालय नाही, त्याच भागात आता सर्वाधिक कोविड केअर सेंटरआहेत. मात्र, आतापर्यंत वरळी डोम एनएससीआय, पोद्दार रुग्णालय, रेसकोर्स तसेच नेहरु सायन्स सेंटर येथे अधिकाधिक सर्वसाधारण खाटांसह ऑक्सिजन खाटा आणि आवश्यकतेनुसार, आयसीयू बेड निर्माण केल्यांनतर आता आणखी ३५० ते ४०० आयसीयू बेड तयार केले आहेत. त्यामुळे वरळी, लोअर परेलसह दक्षिण मुंबईचा भार या केंद्रांमधून उचलला जाणार आहे.

असे वाढणार आयसीयू बेड

वरळीतील नॅशलन स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया(एनएससीआय) येथील कोविड सेंटरमध्ये रुग्ण खाटांची क्षमता ५०० एवढी आहे. ती वाढून आता ८०० एवढी केली जात आहे. याठिकाणी १५० आक्सिजन बेडसह आयसीयू बेड उपलब्ध आहेत. याशिवाय आणखी १०० आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यामुळे ऑक्सिजनसह आयसीयू बेडची क्षमता ही ७० टक्क्यांएवढी करण्यात येत आहे. पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या जागेवर २२५ खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. याठिकाणी आता सीएसआर निधीतून आणखी ३० आयसीयू बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

(हेही वाचाः मुंबईत मागील २० दिवसांमध्ये १ हजार २२८ आयसीयू बेड वाढले, तरीही…)

आदित्य ठाकरे यांचे विशेष प्रयत्न

वरळी नेहरु सायन्स सेंटरमध्ये १५० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र, महालक्ष्मी रेसकोर्सवरील कोविड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनसह ८०० खाटांची व्यवस्था होती व ५० आयसीयूची सुविधा होती, जे आता बंद आहे. तिथे पुन्हा सेंटर सुरू करण्याचा विचार असून, याठिकाणी १५० ते २०० आयसीयू बेड सुरू करण्यात येणार आहेत. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल पुढाकार घेत याठिकाणी महापालिका व सीएसआर निधीतून हे बेड उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करत आहेत. वरळीचे शिवसेना आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे येथील प्रत्येक कोविड सेंटरमध्ये कशाप्रकारे ऑक्सिजन, तसेच आयसीयू बेड वाढतील याचा विचार करुन त्यानुसार बेड उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत.

गैरसोय होणार नाही याकडे लक्ष

महापालिकेचे परिमंडळ दोनचे उपायुक्त विजय बालमवार आणि जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या देखरेखीखाली या सर्व कोविड सेंटरमधील सुविधा पुरवल्या जात आहेत. मात्र, ज्या वरळी व प्रभादेवीच्या जी-दक्षिण विभागात एकही खासगी रुग्णालय, तसेच महापालिकेचे रुग्णालय नाही तिथे अशाप्रकारे सुविधा वाढवण्यावर भर देऊन स्थानिक रहिवाशांची गैरसोय होणार नाही, यावर अधिक लक्ष दिले जात आहे.

(हेही वाचाः मुलुंडच्या जंबो कोविड सेंटरमध्ये ३५ आयसीयू बेड वाढणार!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here