‘रेबिजमुक्त मुंबई’साठी मिशन रेबिज आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार सन २०१४ च्या सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटकी कुत्री होती आणि ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागील ९ वर्षांमध्ये तब्बल ६९ हजार भटक्या कुत्र्यांची वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभाग तसेच मत्स्यपालन आणि पशूसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने वर्ष २०३० पर्यंत कुत्र्यांपासून होणाऱ्या रेबिज रोगाच्या निर्मुलनासाठी राष्ट्रीय कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. याच धर्तीवर मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्याच्या उद्देशाने मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. २०१४ च्या सर्वेक्षणानुसार, मुंबईमध्ये सुमारे ९५ हजार भटकी कुत्री होती आणि ती संख्या आता सुमारे १ लाख ६४ हजारांवर पोहोचल्याचा अंदाज आहे. या भटक्या कुत्र्यांना रेबिज या रोगाची लागण होऊ नये तसेच त्यापासून नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी त्यांना रेबिजची लस देणे गरजेचे असते.
मुंबई महानगरपालिकेच्या वतीने भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्याचा उपक्रम आधीपासूनच सुरू आहे. पण या सामंजस्य करारामुळे लसीकरणाला अधिक गती येईल. सामंजस्य करारानुसार, सप्टेंबर २०२३ पासून या उपक्रमाची सुरुवात होईल. तर जानेवारी २०२४ मध्ये शहरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण केले जाईल. त्या सर्वेक्षणाच्या आधारे फेब्रुवारी २०२३ मध्ये व्यापक स्तरावर रेबिज लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात येईल. या मोहिम अंतर्गत केवळ दहा दिवसांच्या कालावधीत सुमारे १ लाख भटक्या कुत्र्यांना रेबिजची लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी तसेच ‘रेबिजमुक्त मुंबई’ करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने आज (दिनांक २५ जुलै २०२३) महानगरपालिका आणि मिशन रेबिज तसेच वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस (डब्ल्यूव्हीएस) या संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यात आला. हा सामंजस्य करार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. कलीमपाशा पठाण, सहायक महाव्यवस्थापक तसेच या उपक्रमाचे समन्वयक डॉ. मनोजकुमार माने, मिशन रेबिजचे संचालक डॉ. मुर्गन अप्पुपिलाई, मुंबईचे प्रभारी डॉ. अश्विन सुशील, प्रकल्प प्रमुख डॉ. स्नेहा ताटेलू यांची उपस्थिती होती.
मिशन रेबिज आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस देणार निशुल्क सेवा –
मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या या उपक्रमासाठी मिशन रेबिज आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस या दोन्ही संस्था निशुल्क सेवा देणार आहेत. उपक्रमाच्या अनुषंगाने मुंबईतील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण आणि लसीकरणासाठी मिशन रेबिजशी संबंधीत असलेले विदेशातील तज्ज्ञ स्वयंसेवक मुंबईत येतील. यामध्ये हाताने कुत्री पकडणाऱ्या १०० चमू जाळीच्या साहाय्याने कुत्री पकडणाऱ्या २० चमुंचा समावेश आहे. मुंबईतील १ लाख भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यासाठी सुमारे ४५० ते ६०० मनुष्यबळ लागणार आहे. या मनुष्यबळांचा पुरवठा करण्यासाठी विविध महाविद्यालये तसेच स्वयंसेवी संस्थाचीही मदत घेतली जाणार आहे.
महानगरपालिकेच्या वतीने लस आणि वाहतुकीची व्यवस्था –
मिशन रेबिज आणि वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस या संस्थांशी झालेल्या सामंजस्य करारानुसार मुंबईतील भटक्या कुत्र्यांच्या लसीकरणासाठी आवश्यक असलेल्या लसीचा तसेच औषधांचा पुरवठा, प्रसिद्धी आणि जनजागृती, स्वयंसेवकांच्या शहरातील प्रवासासाठी वाहन व्यवस्थेवरील खर्च बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने केला जाणार आहे. तर स्वयंसेवकांचे भोजन, निवास तसेच मानधनाची व्यवस्था वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस या संस्थेकडून केली जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community