मुंबईत या कारणांमुळे वाढते वाहनांची संख्या

मुंबईत मागील काही वर्षांपासून वाहनांची संख्या वाढत असून ही संख्या वाढण्यामागील प्रमुख कारण आता पुढे येऊ लागली आहेत. विशेष म्हणजे यामध्ये बेकायदेशीर वाहनतळ अर्थात पार्किंगची जागा आणि तेथील सहज उपलब्धता हे मुंबईतील कार आणि दुचाकींच्या संख्येत वाढ होण्याचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे मत बनले आहे. बेकायदेशीर पार्किंगच्या अतिक्रमणामुळे रस्त्यांवर वाहतूक कोंडीची फार मोठी समस्या होत असून महापालिका आणि वाहतूक पोलीस यांच्या माध्यमातून रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगवर कारवाई होत नसल्याने मुंबईतील वाढत्या वाहनसंख्येला महापालिका आणि वाहतूक पोलीस जबाबदार असल्याचे स्पष्ट होत आहे.

सन २०१४ पासून आजपर्यंत मुंबईतील वाहनांची घनता १६ उक्क्यांनी वाढली आहे. सन २०१४ च्या सर्वेक्षणामध्ये शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २५.४६लाख एवढी होती, ती २०२० मध्ये वाढून आता सुमारे ४० लाख एवढी झाली आहे. भारतातील सर्वात जास्त गाड्यांची घनता ही मुंबईत असून ती १९०० गाडया प्रति कि.मी इतकी आहे. ही घनता दिल्लीपेक्षा पाच पटीने जास्त आहे. मुंबईतील एकूण रस्त्यांचे जाळे २,००० कि.मीपेक्षा कमी असल्याचे दिसून येत आहे.

सर्वसमावेशक चलनशीलता आराखडा २०१६च्या अहवालानुसार मुंबईतील रस्त्यांवर खाजगी वाहनांची सरासरी संख्या ७०० गाडया प्रती कि.मी एवढी आहे आणि एकूण पार्किंग २०१९ मध्ये खाजगी वाहनांची मागणी ३.६ लाख आहे, जी २०२४ पर्यंत ५.०३ लाख आणि २०३४ पर्यंत ६.७८ लाखांपर्यंत वाढण्याची शक्तता वर्तवली जात आहे. परंतु वाहनतळासाठीच्या जागा, रस्त्यावरील व सार्वजनिक वाहनतळ मिळून मोकळी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे आणि रस्त्यावरील वाहनतळाची जागा फक्त ४५ हजार जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहनतळाच्या जागांचा पुरवठा आणि मागणी यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे.

रस्ते वाहतूक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील वाहनांची संख्या वाढण्यामागील कारणे वेगवेगळी असल्याचे म्हणले आहे. तज्ज्ञांच्या मते, नागरिकांच्या राहणीमानामध्ये झालेली सुधारणा, ऑटोमोबाईल उद्योगातील तेजी तसेच वाहन खरेदीकरीता सवलतीच्या दरात बँकांकडून उपलब्ध होणारे कर्ज यामुळे वाहनांची संख्याही झपाटयाने वाढत आहे. तसेच रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंगची जागा आणि तेथील सहज उपलब्धता ही मुंबईतील कार आणि दुचाकींच्या संख्येत वाढ होण्याचे कारण असल्याचे तज्ञांचे मत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here