क्वारंटाईन केलेल्या विदेशी प्रवाशांवर तपासणी पथकाचा वॉच!

विलगीकरणाशी संबंधित कोणत्याही नियमाचे अथवा निकषाचे उल्‍लंघन झाल्याचे निदर्शनास आले तर साथरोग नियंत्रण कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यातील तरतुदींच्याआधारे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात अर्थात क्वारंटाईन केल्यानंतर त्यांच्यााकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने आता मुंबई महापालिकेने सुधारीत एसओपी तयार केली आहे. ज्याा भागातील हॉटेलमध्ये विदेशातून आलेल्या प्रवाशाला क्वारंटाईन केले असेल, त्या हॉटेलमध्ये प्रत्यक्षात ते प्रवाशी राहत असल्याची खातरजमा करण्यासाठी विभागीय सहायक आयुक्तांना तपासणी पथक तयार करण्याचे  निर्देश दिले आहेत. हे तपासणी पथक प्रवाशी क्वारंटाईन असलेल्या हॉटेलमध्ये भेट देवून आता ते नियमांचे योग्यप्रकारे पालन करतात की नाही याची खातरजमा करणार आाहे. त्यामुळे जे प्रवाशी यापुढे नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांच्यावर आता त्यांच्यावर साथरोग कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार आहे.

प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे सक्तीचे!

मुंबई विमानतळावर विदेशातून हवाईमार्गे येणाऱया प्रवाशांसाठी २१ डिसेंबर २०२० आणि २७ डिसेंबर २०२० रोजीच्या आदेशानुसार सुनिश्चित कार्यपद्धती लागू करण्यात आली आहे. त्यानुसार यूके, युरोप, मध्य पूर्व, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिल या देशातून मुंबईत येणाऱया प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहणे या आदेशान्वये सक्तीचे करण्यात आले आहे. मुंबई महानगरात निर्देशित केलेल्या हॉटेल्समध्ये या प्रवाशांना विलगीकरण कालावधीत रहावे लागते. या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करताना त्यामध्ये विलगीकरणापासून पळवाट शोधून काही गैरप्रकार करण्याचा प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ते बदल करुन सुधारित कार्यपद्धती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. जेणेकरुन, मुंबई विमानतळावर उतरल्यापासून प्रवाशांची पडताळणी, वाहतूक व संस्थात्मक विलगीकरण ही सर्व प्रक्रिया योग्यरित्या आणि कोणत्याही दोषाविना पार पाडली जाईल.

(हेही वाचा : ५ पेक्षा अधिक रुग्ण असलेली सोसायटी ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’!)

सहाय्यक आयुक्तांनी प्रत्यक्ष विलगीकरण केंद्रांना भेट द्यावी!

संबंधित विभाग कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्तांनी, आपापल्या विभागाच्या कार्यक्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणासाठी निर्देशित केलेल्या हॉटेलमध्ये विलगीकरणासाठी पाठवलेले प्रवाशी प्रत्यक्षात राहत असल्याची वेळोवेळी खातरजमा करता यावी यासाठी तपासणी पथकांची नियुक्ती करावी. विमानतळावर नियुक्त पथकाकडून संपूर्ण माहितीसह यादी प्राप्त झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त यांनी नियुक्त केलेल्या तपासणी पथकांनी प्रत्यक्ष विलगीकरण केंद्रांना भेट द्यावी. तसेच संबंधित प्रवाशी निर्देशित हॉटेलमध्ये पोहोचल्याची आणि विलगीकरण संदर्भातील नियमांचे योग्यरितीने पालन करीत असल्याची खातरजमा करावी. प्रत्येक प्रवाशाच्या विलगीकरण कालावधीतील दुसऱ्या व सहाव्या दिवशी किमान दोनदा याप्रकारची तपासणी करणे आवश्यक असेल.

…अन्यथा साथरोग नियंत्रण कायदा १८९७ नुसार कारवाई करावी!

विलगीकरणाशी संबंधित कोणत्याही नियमाचे अथवा निकषाचे उल्‍लंघन झाल्याचे निदर्शनास आले तर सहाय्यक आयुक्त अथवा त्याचे प्रतिनिधी यांनी साथरोग नियंत्रण कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ यातील तरतुदींच्याआधारे योग्य आणि कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोविड – १९ विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून मुंबई विमानतळावर हवाईमार्गे येणाऱया प्रवाशांसाठी लागू असलेल्या सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. ही सुधारित कार्यपद्धती तत्काळ लागू करण्यात आली असून त्याचे कटाक्षाने पालन करण्याच्या सक्त सूचना महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी दिले आहेत. मुंबईत हवाईमार्गे येणाऱ्या सर्व प्रवाशांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनास संपूर्ण सहकार्य करावे, कोविड प्रतिबंधात्मक सूचना आणि निर्देश यांचे परिपूर्ण पालन करावे, कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करु नये, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here