मागच्या काही दिवसांपासून देशात इलेक्ट्रिक स्कूटर पेट घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे आता इलेक्ट्रिक स्कूटर बनवणा-या ओला इलेक्ट्रिकने 1 हजार 441 इलेक्ट्रिक दुचाकी वाहने बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 26 मार्च रोजी पुण्यात इलेक्ट्रिक दुचाकीला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करत असल्याचे कंपनीने निवेदनात म्हटले आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून, कंपनी 1 हजार 441 इलेक्ट्रिक वाहने बाजारातून मागे घेत असून, या स्कूटरची चाचणी करण्यात येणार आहे.
तपासणीसाठी स्कूटर मागे
ओलाने म्हटले की, स्कूटर्सची कसून तपासणी केली जाईल. बॅटरी सिस्टिम, थर्मल सिस्टिम ते सुरक्षा व्यवस्थेपर्यंत सर्व तपासले जाईल. बॅटरीची एआयएस 156 साठी चाचणी करण्यात आली आहे. याशिवाय, ही बॅटरी युरोपियन मानतक ईसीई 136 ला देखील पूर्ण करते, असा दावा कंपनीने केला आहे.
( हेही वाचा: आता सव्वा तासात औरंगाबादहून गाठा पुणे, असा असणार नवा मार्ग! )
या कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर घेतल्या माघारी
मागच्या काही दिवसांत इलेक्ट्रिक वाहनांच्या गाड्या पेट घेण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे आता इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्या बाजारातून त्यांची वाहने परत मागवत आहेत. ओकिनावा ऑटोटेकने बाजारातून 3 हजारहून अधिक तर प्युअर ईव्हीनेदेखील बाजारातून 2 हजार दुचाकी परत मागवल्या आहेत.