राज्य शासनातील सर्वांना जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागू करण्यासंदर्भात शासनाला सादर झालेल्या अहवालास मंजुरी व अंमलबजावणी करण्यास होत असलेल्या शासन दिरंगाईमुळे सर्व अधिकाऱ्यांमध्ये असंतोषाची भावना पसरली आहे. त्या अनुषंगाने १४ डिसेंबर २०२३ रोजी ‘सामूहिक रजा’ आंदोलन करण्याचा निर्धार अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २२ नोव्हेंबर २०२३ रोजी बैठक झाली
जुनी पेन्शन (Old Pension Scheme) लागू करणे, तसेच इतर महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यांसंदर्भात, १४ डिसेंबर २०२३ रोजी सामूहिक रजा आंदोलन करण्याबाबत अधिकारी महासंघाच्या ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत सुतोवाच केले होते. याच पार्श्वभूमीवर, राज्याचे मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखाली ६ नोव्हेंबर २०२३ आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २२ नोव्हेंबर २०२३ रोजी अधिकारी महासंघाच्या बैठका झाल्या. त्याच अनुषंगाने २२ नोव्हेंबर २०२३ रोजी जुनी पेन्शन संदर्भातील समितीचा अहवाल देखील शासनास सादर झाला आहे. परंतु, राज्य शासनाकडून अद्याप सदर अहवाल मंजूरी तसेच त्याच्या अंमलबजावणीबाबत अवाजवी विलंब होत आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री यांनी २० मार्च, २०२२ रोजी दिलेल्या आश्वासनानुसार, जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक लाभ; सामाजिक आणि आर्थिक स्थैर्यासह नवीन पेन्शनधारकांना निवृत्तीवेतन देण्याच्या तत्वाचे तंतोतंत पालन होईल की नाही, याबद्दल सर्व अधिकाऱ्यांमध्ये साशंकता आहे.
(हेही वाचा Lalit Patilचा पहिला ड्रग्जचा कारखाना सापडला; पण चौकशी झालीच नाही; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट)
राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये नाराजी
शासन-प्रशासन प्रमुखांसमवेतच्या बैठकांमध्ये, सर्व राज्य शासकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच जिव्हाळ्याच्या इतर मागण्यांबाबत देखील अधिकारी महासंघाने आग्रही भूमिका मांडली होती. तथापि, शासनाने फक्त सकारात्मकता दर्शवत अद्याप कोणतेही शासन निर्णय निर्गमित केलेले नाहीत. त्यामुळेच राज्यभरातील सर्व अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, आज झालेल्या अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये १४ डिसेंबर, २०२३ रोजी राज्यव्यापी सामूहिक रजा आंदोलन करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. सदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, महासंघाचे सर्व पदाधिकारी, संलग्न संघटनांचे पदाधिकारी, जिल्हा समन्वय समित्यांचे पदाधिकारी यांनी संबंधित विभागांतील अधिकाऱ्यांना एक दिवसाच्या सामूहिक रजेबाबत (नैमित्तिक/अर्जित/असाधारण) मार्गदर्शन करुन, आंदोलनात सर्वांचा सक्रीय सहभाग नोंदवावा व आंदोलन यशस्वी करावे, असे अधिकारी महासंघाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
Join Our WhatsApp Community