म्हाडाच्या जुन्या शौचालयांची महापालिकेच्या माध्यमातून होणार दुरुस्ती

141

मुंबई सुमारे २२ हजार शौचालयांची उभारणी महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात आली असली तरी अनेक म्हाडाच्या जुन्या शौचालयांची दुरावस्था आहे. मुंबईतील गलिच्छ वस्त्यांमध्ये महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या जागेवर शौचालयांची उभारणी केली जात असली तरी म्हाडाच्या जागेवरील जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीचा प्रश्न ‘जैसे थे’च होता. त्यामुळे अखेर म्हाडाच्या जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे उपनगराच्या पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून म्हाडाच्या जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आल्याने आता महापालिकेच्यावतीने या जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

मुंबई शहर आणि उपनगरांमधील म्हाडाच्या जुन्या शौचालयांच्या दुरुस्तीसह अनेक मोडकळीस आलेल्या शौचालयांच्या जागेवरील पुनर्बांधकाम हे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. स्थानिक आमदारांच्या माध्यमातून म्हाडाच्या जुन्या शौचालयांची दुरुस्ती केली जात असली तरी अनेक म्हाडाच्या शौचालयांची दुरवस्थाच आहे. त्यामुळे उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून म्हाडाच्या जुन्या शौचालय दुरुस्तीसाठी महापालिकेला निधी मंजूर करून दिला आहे. त्यानुसार उपनगरातील म्हाडाच्या जुन्या  शौचालयांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. मलकुंडासह ज्या काही भागांमध्ये मलवाहिनीची व्यवस्था आसपास आहे अशांचाही सर्वे केला जाणार असून जिथे मलकुंड आवश्यक नाही तिथे मलनि:सारण वाहिन्यांना जोडण्याचेही काम केले जाईल, अशी माहिती मिळत आहे.

(हेही वाचा Cow Hug Day : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गायीला अलिंगण देण्याचे आवाहन केंद्राने घेतले मागे)

महापालिकेने यासाठी परिमंडळ ६ व ७ साठी निविदा मागवण्यात आली आहे. यामध्ये जुन्या म्हाडा शौचालयांच्या मलकुंडासह बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार असून त्यानुसार आवश्यक तिथे मलकुंड साफ करणे, तसेच त्यांचे बांधकाम करणे आदींची कामे दुरुस्तीअंतर्गत हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे उपनगरांमधील महापालिकेच्या १५ प्रशासकीय वॉर्डासाठी ही निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मिळत आहे.

उपनगरातील म्हाडा शौचालयांच्या दुरुस्तीसाठी पालकमंत्र्यांनी निधी मंजूर केला असला तरी शहरातील अशा प्रकारच्या शौचालय दुरुस्तीसाठी निधी मंजूर झालेला नाही. शहर भागातही म्हाडाचे जुने शौचालय असल्याने महापालिकेने शहराच्या पालकमंत्र्यांनाही अशाप्रकारची कामे हाती घेण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचीही माहिती मिळत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.