सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रेल्वे प्रशासनानेही उपनगरीय रेल्वे स्थानकांत गर्दी होणार नाही, याची खबरदारी रेल्वे प्रशासन घेत आहे. असे असतांनाही ७ एप्रिल रोजी सोशल मीडियात जुना व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेतली आहे. त्याविरोधात रेल्वेने रेल्वे पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
जुना व्हिडिओ एडिट करून व्हायरल!
या विरोधात रेल्वे प्रशासनाने तक्रार दाखल केली असून, ज्या मोबाईल क्रमांकावरून हा व्हिडिओ व्हायलर झाला आहे, तो मोबाईल नंबरही रेल्वेने दिला आहे. हा जुना व्हिडिओ असून तो एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. अशा प्रकारे व्हिडिओ व्हायरल करून जनसामान्यांमध्ये तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे, असे या तक्रारीत म्हटले आहे. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी यासंबंधीची तक्रार केली आहे.
(हेही वाचा : का निर्माण झाली रेमडेसिवीरची टंचाई? जाणून घ्या…)
गर्दी नियंत्रणासाठी आरपीएफ जवान तैनात
रेल्वेने या तक्रारीमध्ये संबंधित व्हिडिओ असलेली सीडी देखील पोलिसांना दिली आहे. त्या व्हिडिओमध्ये ज्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल रेल्वे स्थानकात तुफान गर्दी झाल्याचे दिसत होती, प्रत्यक्षात मात्र त्या दिवशी गर्दी अजिबात नव्हती. ७ एप्रिलच्या आधी २ दिवसांपासून या रेल्वे स्थानकात गर्दी नव्हती. रेल्वेने आरपीएफ जवान रेल्वे स्थानकांत तैनात केले आहेत. ते स्थानकांत गर्दी होणार नाही, याची खबरदारी घेत आहेत. अशा प्रकारे सीएसटीएम, एलटीटी, कल्याण, दादर आणि ठाणे या महत्वाच्या रेल्वे स्थानकांवर अशी खबरदारी घेण्यात येत आहे, असेही रेल्वेने म्हटले आहे. अशाप्रकारे जनसामान्यांमध्ये तणाव निर्माण करण्याच्या हेतूने हा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे याची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रेल्वेने केली आहे. तसेच सोशल मीडियातून हा व्हिडिओ काढून टाकण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
रिकाम टेकडे उद्योग बंद करा!
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून पहिल्याप्रमाणे पुन्हा एकदा सोशल मीडियावरून याविषयी पोस्ट व्हायरल होऊ लागल्या आहेत. यात अनेकजण मनाप्रमाणे वैद्यकीय सल्ले देत आहेत, तर कुणी कोरोना वगैरे काही नाही, घाबरू नका, अशी दिशाभूल करणारे व्हिडिओ व्हायरल करत आहेत. प्रशासनाने याआधीच असा कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केल्यास कारवाई करू, असे म्हटले आहे. आता रेल्वेबाबत गैरसमज निर्माण करणारे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्याचीही रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे. त्यामुळे कोरोनासारख्या महामारीत कुणी असे रिकाम टेकडे उद्योग करणार असेल त्यांनी सावध व्हावे, अन्यथा त्यांना जेलची हवा खावी लागेल.
Join Our WhatsApp Community