मंदिरांमध्ये (Hindu Temple) भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत. यामुळे हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात प्रसाद शुद्धी चळवळ उभी करण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, अखिल भारतीय संत समिती धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेशचे महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज यांनी पुढाकार घेऊन ही चळवळ सुरू केली आहे. प्रसाद शुद्धी चळवळीसाठी पुढाकार घेणारे रणजित सावरकर यांना आखाडा परिषदचे सचिव स्वामी शंकरानंद महाराज, आखाडा परिषदचे कोषाध्यक्ष महंत गिरिजानंद महाराज यांनी आशीर्वाद दिले.
नाशिकमध्ये बैठकांचे सत्र
या चळवळीची सुरुवात शुक्रवार, 14 जूनपासून नाशिक येथील नाशिकमधील श्री त्र्यंबकेश्वर मंदिरापासून होणार आहे. या प्रसाद शुद्धी चळवळीच्या अंतर्गत प्रसाद विक्रेत्यांना ओम प्रमाणपत्राचे (OM Certification) वितरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या विक्रेत्यांना ते तयार करत असलेल्या प्रसादाची शुद्धता सिद्ध करावी लागणार आहे. या चळवळीसाठी कुंभनगरी नाशिक येथे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आणि वीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर हे नाशिक येथील विविध हिंदुत्ववादी संघटना, धार्मिक संघटना यांच्या प्रतिनिधींची भेट घेत आहेत.
या बैठकांमध्ये या चळवळीला हिंदुत्ववादी संघटनांकडून पाठिंबा मिळत आहे. तसेच संत, महंत यांचे आशीर्वाद मिळत आहेत. रणजित सावरकर यांनी आखाडा परिषद सचिव स्वामी शंकरानंद महाराज, आखाडा परिषद कोषाध्यक्ष महंत गिरिजानंद महाराज, महंत गिरी महाराज यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी रणजित सावरकर यांना या कार्यासाठी शुभाशीर्वाद दिले. यावेळी पंचदशनाम नागा संन्यासी, आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर या सर्वांनी या चळवळीला पाठिंबा दिला. (OM Certification)
Join Our WhatsApp Community