पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात रविवारी ६ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहे. यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या पन्नाशीपार जात ५४वर पोहोचली आहे.
रविवारी आढळून आलेल्या ६ नव्या रुग्णांपैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळावर, पुणे व पिंपरीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील जुन्नर येथे आंतरराष्ट्रीय प्रवाशाच्या संपर्कातील पाच वर्षाला ओमायक्रॉनची लागण झाली आहे. मुंबईतील वाढत्या ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे आतापर्यंतची रुग्णसंख्या २३वर पोहोचली आहे. मात्र १३ रुग्णांवर यशस्वी उपचार केल्याने आता केवळ १० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
रविवारी आढळलेल्या ओमायक्रॉनच्या नव्या रुग्णांचा तपशील
मुंबई
- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोरोनाची चाचणी सकारात्मक आल्यानंतर ४ रुग्णांना पालिकेच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी ४ रुग्णांची ओमायक्रॉनची चाचणी सकारात्मक आली. या चारही रुग्णांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.
- चार रुग्णांपैकी २ स्त्रिया व २ पुरुष आहेत. हे रुग्ण २१ ते ५७ वयोगटातील आहेत.
- २ रुग्ण कर्नाटकातील, १ रुग्ण औरंगाबाद येथील तर १ रुग्ण दमण येथील आहे.
- २ रुग्णांनी टांझानिया तर २ रुग्णांनी इंग्ल्डंचा प्रवास केला होता.
(हेही वाचा करायचे होते पेट्रोल-डिझेल स्वस्त, पण ठाकरेंनी केली दारु स्वस्त!)
पुणे
पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील ५ वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉनचा विषाणू आढळला. या रुग्णामध्ये कोणतीही लक्षणे नाहीत.
पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड येथील ३६ वर्षीय पुरुषाने मध्य पूर्वेला प्रवास केला होता. या रुग्णामध्ये सौम्य लक्षणे असून, तो सध्या खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
राज्यात सध्या ओमायक्रॉनच्या २६ रुग्णांवर विविध जिल्ह्यांत उपचार सुरु आहेत. तर कोरोनाबाधित ७ हजार ६८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या व्यतिरिक्त कोरोनाचे रविवारी ९०२ रुग्ण आढळून आले आहेत. गेले तीन दिवस कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या दर दिवसाला आठशेहून अधिक आढळत आहे. मात्र आज मृत्यू झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा एक अंकावर दिसून आला. राज्यात रविवारी केवळ ९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ७६७ रुग्ण कोरोनावर यशस्वी उपचार घेत बरे होऊन गेले.