कल्याण-डोंबिवली येथे ओमायक्रोनचा राज्याचा पहिला रूग्ण सापडला आहे, अशा प्रकारे ओमायक्रोनचा राज्यात शिरकाव झाला आहे. त्या रूग्णाचा अहवाल कस्तुरबा रूग्णालयात प्रलंबित होता, तो अहवाल आला आहे, ३३ वर्षीय या रूग्णामध्ये सामान्य लक्षणे आहेत. सध्या त्याच्यावर अभ्यास सुरू आहे. अजूनही २८ नमुने प्रलंबित आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात जरी ओमायक्रोनचा प्रवेश झाला असला तरी घाबरण्याचे कारण नाही. आफ्रिकेतील अनुभवानुसार हे रूग्ण गंभीर आजारी नसतात, मात्र त्याचा फैलाव जलद आहे. म्हणून यावर खबरदारी घेणे, नियम पाळणे, हाच एकमेव उपाय आहे. एक रूग्ण सापडला म्हणून लॉकडाऊन लावणे, निर्बंध लावणे चुकीचे आहे, सध्या तरी असा कोणताही विचार नाही, असे राजेश टोपे म्हणाले.
केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला होता
हा रुग्ण २४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन शहरामधून दुबई आणि दिल्लीमार्गे मुंबईत आला होता. त्याच दिवशी रुग्णाला सौम्य ताप आला होता. या रुग्णातील कोरोनाच्या मायक्रोन विषाणूचे निदान प्रयोगशाळेत सिद्ध झाले. इतर कोणतीही लक्षणे नसल्याने हा रुग्ण कल्याण-डोंबिवलीतील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे. त्याचा आजार सौम्य स्वरुपाचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. रुग्णात ऑमायक्रोन विषाणूचे निदान झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील माणसांची कोरोना चाचणी करण्यात आली. ३५ जणांची कोरोना तपासणी केली गेली. त्यापैकी १२ अतिजोखमीचे तर २३ कमी जोखमीचे नातेवाईक होते. मात्र सर्वांची कोरोना तपासणी निगेटीव्ह आली. याशिवाय या रुग्णाने दिल्ली ते मुंबई विमानप्रवास ज्या विमानाने केला, त्या सर्व २५ प्रवाशांची कोरोना तपासणी केली गेली आहे. हे सर्व जण कोविड निगेटीव्ह आले आहेत. मात्र या रुग्णाच्या एका नजीकच्या माणसाचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जातो आहे. या दरम्यान, झांबिया देशातून पुण्यात आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीच्या अहवालात ओमायक्रॉन आढळलेला नाही. या रुग्णात डेल्टा सबलिनिएज आढळून आला आहे.
(हेही वाचा अजून एका परदेशी प्रवाशाला कोरोनाची लागण)
खबरदारीचे उपाय
शनिवारी सकाळपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील अतिजोखमीच्या देशातून आलेल्या तब्बल ३ हजार ८३९ प्रवाशांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. इतर देशांमधून आलेल्या १७ हजार १०७ प्रवाशांपैकी ३४४ प्रवाशांची कोरोना तपासणी झाली आहे. शिवाय १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचीही तपासणी केली जात आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
विषाणूमध्ये बदल होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. लोकांनी घाबरु नये, कोरोनाची बाधा टाळण्यासाठी आवश्यक सूचनांचे पालन करावे. नागरिकांनी प्राधान्याने लसीकरण पूर्ण करावे. गेल्या महिन्यात जे प्रवासी आंतरराष्ट्रीय प्रवास करुन भारतात परतले आहेत, त्यांनी आपली माहिती स्थानिक आरोग्य विभागाला द्यावी.
Join Our WhatsApp Community