‘६ डिसेंबर’ला चैत्यभूमीत रोखाल, तर याद राखा!

कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गेली दोन वर्षे मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर महापरिनिर्वाणदिनी म्हणजेच ६ डिसेंबरला महामानव प्रज्ञावंत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यास अनुयायांना निर्बंध लादण्यात येत आहे. ६५ व्या महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येणाऱ्या लाखो आंबेडकरी अनुयायांना यंदा अभिवादन करता येणार, अशी आशा होती. पण राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनची भिती दाखवून चैत्यभूमीवर येण्यास यंदाही निर्बंध लावले. महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय चुकीचा असून समितीने यावर पुनर्विचार करावा, अन्यथा लाखो आंबेडकरी अनुयायांसोबत चैत्यभूमीवर प्रवेश करणार, असा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांनी दिला आहे.

भीम जनतेची गर्दी चालत नाही हे दुर्दैव

गेल्या दोन वर्षांपासून भीम अनुयायांना महामानवाच्या महापरिनिर्वाणदिनाला त्यांचे स्मृतीस्थळ असलेल्या दादर येथील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यास वंचित ठेवण्यात येत आहे. तर दुसरीकडे राजकीय नेत्यांच्या पाल्यांच्या लग्न समारंभात झालेली गर्दी चालते, राजकीय पक्षांच्या सभा मेळाव्यात होणारी गर्दी चालते, तसेच गेल्या महिन्यात पंढरपुरात कार्तिकी वारीला लाखो भाविकांची गर्दीही चालते. मात्र, कोट्यवधी भीम सैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत चैत्यभूमीवर भीम जनतेची गर्दी चालत नाही, हे दुर्दैव आहे, असे मत जयदीप कवाडे यांनी व्यक्त केले आहे. प्रशासनाने भीम अनुयायांच्या आस्थेच्या या प्रश्नावर त्वरित तोडगा काढवा. तसेच चैत्यभूमीवर लादलेले निर्बंध काढून कोविड नियमांप्रमाणे दर्शन घेऊ द्यावे. येत्या तीन दिवसांत सरकारने यावर निर्णय घेतला नाही, तर पीपल्स रिपब्लिकन पार्टी लाखो भीम सैनिकांसह चैत्यभूमीवर महामानवाचे दर्शन घेणार असेही त्यांनी स्पष्ट केले.

( हेही वाचा : फेरीवाले बनून मुले चोरणारी महिला टोळी मुंबईत सक्रिय )

निळ्या पाखरांच्या भावनांचा विचार करा

ओमिक्रॉनचा संसर्ग परदेशात अधिक फोफावला असताना भारताने या विषाणूंची धास्ती घेतली आहे. मात्र ओमिक्राॅनचे सदृश्य रूग्ण नाहीत. महापरिनिर्वाण अभिवादनाची तारीख तोंडावर असताना महाविकास आघाडी सरकारने तडकाफडकी चैत्यभूमीवर निर्बंध लावले. परंतु महासूर्याला कृतज्ञतापूर्ण नमन करण्यासाठी कोट्यवधीच्या संख्येने येणाऱ्या भीम सैनिकांच्या भावनांचा विचार महाविकास आघाडी सरकारने केला नाही. महाविकास आघाडी सरकारने निळ्या पाखरांच्या भावनांचा विचार करावा आणि चैत्यभूमीत आंबेडकरी अनुयायांना प्रवेश द्यावा, असेही जयदीप कवाडे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here