लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज; जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी दक्षता घेण्याचे आवाहन

87

मुंबईकरांच्या घरी लाडक्या बाप्पाचे आगमन होण्यासोबतच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये देखील गणराय विराजमान झाले. या लाडक्या गणरायाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी शुक्रवारी निरोप देत पुढच्या वर्षी लवकर येण्याचे विनंतीही भक्तांकडून केली जाणार आहे. या बाप्पांना निरोप देण्यासाठी महानगरपालिका विविध सेवा-सुविधांसह सुसज्ज आहे.श्रीगणेश मूर्ती विसर्जन ऑनलाईन नोंदणीसाठी https://shreeganeshvirsarjan.com या संकेतस्थळावर नोंदणी सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच घरगुती श्रीगणेश मूर्तिचे व छोट्या श्रीगणेश मूर्तिचे विसर्जन हे प्राधान्याने कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे. यासाठी आपल्या घराजवळील कृत्रिम तलावाची माहिती नागरिकांना सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी व्हॉट्सअप क्रमांक ८८९९९-२२-८९९९ याद्वारे ‘जीपीएस’ आधारित माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

( हेही वाचा : मुंबईत 72 मिमीहून अधिक पाऊस; ठाणे आणि नवी मुंबईतही जोरदार )

महानगरपालिका आयुक्त डॉ. इ. सिं. चहल आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात अनंत चतुर्दशीच्या अनुषंगाने विविध स्तरिय सेवा-सुविधांबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ७३ नैसर्गिक विसर्जनस्थळी करण्यात आलेली विविध स्तरिय सुव्यवस्था आणि १६२ ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे उभारण्यात आलेले कृत्रिम विसर्जन स्थळांचा समावेश आहे, अशी माहिती उप आयुक्त (परिमंडळ – २) तथा गणेशोत्सव समन्वयक रमाकांत बिरादार यांनी दिली आहे.

अनंत चतुर्दशीदिनी मुंबई महानगरपालिकेचे कामगार – कर्मचारी – अधिकारी अव्याहतपणे कार्यरत असतात. या दिवशी सुमारे १० हजार एवढ्या संख्येने महानगरपालिकेचे मनुष्यबळ कार्यरत असते. यावर्षी स्वराज्यभूमी (गिरगांव चौपाटी) येथून विसर्जन मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण समाजमाध्यमांद्वारे करण्यात येणार आहे. बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्‍थळी सर्व ती व्‍यवस्‍था केली असून मुंबईकर गणेशभक्‍त नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे पुन्हा एकदा करण्यात येत आहे.

श्री गणेश विसर्जनासाठी येणारे वाहन हे चौपाटीवरील भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किना-यांवर ४६० जाड लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जर्मन तराफ्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ७८६ जीवरक्षकांसह ४५ मोटर बोटींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी ३५७ निर्माल्य कलशांसह निर्माल्य वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर व डंपर या वाहनांचा समावेश आहे.

महानगरपालिकेच्या विविध खात्यातील कर्मचा-यांमध्ये योग्‍य तो समन्वय साधण्यासाठी मुख्य नियंत्रण कक्षासह प्रशासकीय विभागांच्या स्तरावर १८८ नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. तर सुरक्षेच्या दृष्टीने ४८ निरिक्षण मनोरे उभारण्‍यात आले आहेत. अन्‍य ठिकाणी २११ स्‍वागत कक्ष तयार ठेवण्‍यात आली आहेत. आरोग्‍य विभागाकडून १८८ प्रथमोपचार केंद्रांची व्‍यवस्‍था करण्‍यासह ८३ रुग्णवाहिका देखील सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

प्रभावी प्रकाश योजनेसाठी ‘बेस्ट’ च्या सहकार्याने खांबांवर व उंच जागी सुमारे ३,०६९ दिवे (फ्लड लाईट) व ७१ शोधदीप (सर्च लाईट) ची व्यवस्था, नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या १३४ शौचालयांची (मोबाईल टॉयलेट्स) व्यवस्थाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहिनासहीत मनुष्यबळाची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोईंग वाहने, क्रेन्स, जे. सी. बी. मशिन्स, बुलडोझर इत्यादी यंत्रसामुग्री देखील तैनात करण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशीदिनी सर्व विसर्जनस्थळी नागरिकांनी पावित्र्य व मांगल्य जपावे. उत्सवादरम्यान गर्दीच्या ठिकाणी तसेच विसर्जन प्रसंगी पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यावी, श्रीगणेश मूर्तिंचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे, जेणेकरुन अप्रिय घटना टाळता येतील. तसेच या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे व मुंबई पोलीस दलाद्वारे देण्यात येणा-या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

अशा प्रकारे भाविकांनी घ्यावी श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करताना काळजीः-

१.खोल पाण्‍यात जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.

२.भरती व ओहोटीच्‍या वेळांची माहिती समुद्रकिना-यांवर लावण्‍यात आली आहे, ती समजून घ्‍या.

३.गणेशमूर्ती विसर्जनाकरीता महानगरपालिकेमार्फत नेमण्‍यात आलेल्‍या प्रशिक्षित मनुष्‍यबळाची मदत घ्‍या.

४.अंधार असणा-या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.

५. महानगरपालिकेने पोहण्‍याकरीता निषिद्ध केलेल्‍या क्षेत्रात जाण्‍याचा प्रयत्‍न करु नका.

६.गणेशमूर्तींचे विसर्जन करताना शक्‍यतो तराफ्यांचा, प्रशिक्षित मनुष्‍यबळाचा वापर करा.

७.समुद्रात / तलावात कुणी बुडत असल्‍याचे निदर्शनास आल्‍यास त्‍वरित त्‍याची माहिती अग्निशमन दलाच्‍या जवानांना / पोलिसांना / जीवरक्षकांना द्या.

८.नाका-तोंडात पाणी गेल्‍यामुळे श्‍वसनाचा त्रास जाणवत असल्‍यास तात्‍काळ वैद्यकीय मदत घ्‍या.

९.अफवांवर विश्‍वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.

खबरदारीच्‍या सूचनाः

१.भाविकांनी आपल्‍या लहान मुलांची विशेष काळजी घ्‍यावी. त्‍यांना पाण्‍यात / विसर्जनस्‍थळी जाण्‍यापासून मज्‍जाव करावा.

२.गणेशभक्‍तांनी मूर्तिंचे विसर्जन करतेवेळी पाण्‍यात गमबुट घालावेत.

३.महानगरपालिकेने केलेल्‍या विसर्जनाच्‍या व्‍यवस्‍थेचा म्‍हणजे विनामुल्‍य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करावा.

४.मद्यप्राशन करुन समुद्रकिना-यावर विसर्जनस्‍थळी जाऊ नये, कारण अशा व्यक्तिंवर मस्‍त्‍सदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.

५. भारतीय हवामान खात्याने दि. ०९ व १० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई आणि परिसरासाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अधिकाधिक दक्षता घ्यावी, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

विसर्जन करताना मत्‍स्‍यदंश झाल्‍यास काय करावे…

१.समुद्रातून बाहेर आल्‍यावर आपणांस मत्‍स्‍यदंश झाल्‍याचे जाणवल्‍यास तात्‍काळ सदर जागा स्‍वच्‍छ पाण्‍याने धुवावी अथवा उपलब्‍ध असल्‍यास त्‍यावर बर्फ लावणे.

२.माशांचा दंश झालेल्‍या ठिकाणाहून रक्‍तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्‍वच्‍छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावे, जेणेकरुन जास्‍त प्रमाणात रक्‍तस्राव होणार नाही.

३. मत्‍स्‍यदंश झालेल्‍या भाविकांनी घाबरुन न जाता महानगरपालिकेच्‍या समुद्रकिना-यावरील प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामुल्‍य वैद्यकीय सेवा प्राप्‍त करुन घ्‍यावी.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.