मुंबई महानगरपालिकेच्या वतीने येत्या रविवारी म्हणजे १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते ११ या एक तासाच्या वेळेत ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. यासाठी मुंबईत १५९ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये स्वराज्य भूमी (गिरगाव), जुहू, गोराई चौपाटी, ऑगस्ट क्रांती मैदान, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, सिद्धीविनायक, लालबागचा राजा, चैत्यभूमी, आरे आणि पवई तलाव आदी प्रसिद्ध ठिकाणांसह शाळा, महाविद्यालय, धार्मिक स्थळे, बाजारपेठा, रेल्वे स्थानक, बस स्थानक, उद्यान आदी ठिकाणी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी नजीकच्या परिसरातील स्वच्छता अभियानात सहभागी होऊन एकत्रितपणे श्रमदान करावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० वाजता एक तास श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राष्ट्रीय पातळीवर आयोजित केला आहे. महानगरपालिकेसह मुंबई पोलिसांचाही या स्वच्छता अभियानात संयुक्त सहभाग आहे. त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार, महानगरपालिका कार्यक्षेत्रात १५९ विविध सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. स्वच्छता श्रमदानासाठी प्रत्येक प्रशासकीय विभागामध्ये सहायक आयुक्तांनी ५ ते ७ ठिकाणे निश्चित केली आहेत. ही सर्व ठिकाणे https://swachhatahiseva.com या संकेतस्थळावर उपलब्ध पर्यायांद्वारे पाहता येतील. ही ठिकाणे नकाशावरदेखील उपलब्ध आहेत.
(हेही वाचा – BMC : मुंबईत यंदाही पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ प्रथम)
उप आयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव म्हणाल्या की, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी नागरिकांसह स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक विविध क्षेत्रातील मान्यवर, स्थानिक कलावंत, उद्योजक यांना श्रमदानामध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. नागरी संघटना आणि स्वयंसेवक, स्वयंसेवी संघटना यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. स्वच्छता मोहिमेसाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून आवश्यक यंत्रणा आणि उपकरणे, साहित्य उपलब्ध ठेवण्याची खबरदारी घेतली आहे. मुंबईकर नागरिकांनी आपल्या नजीकच्या स्वच्छता अभियानात श्रमदानासाठी सहभागी व्हावे आणि त्या ठिकाणी छायाचित्रे घेऊन संकेतस्थळावर अपलोड करावे. महानगरपालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात राबविल्या जाणाऱ्या या अभियानामध्ये मुंबईकरांनी विशेष करून युवकांनी सहभागी होऊन अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही चंदा जाधव यांनी केले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community