एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई म्हणून जर काही रक्कम मिळाली, तर त्यावर प्राप्तीकर विभाग कर आकारणार का? अशी विचारणा गुजरातच्या उच्च न्यायालयाने मंगळवारी प्राप्तीकर विभागाला केली. व्यक्तीच्या मृत्यूवरही कर आकारणार का? असा प्रश्न न्यायालयाने प्राप्तीकर विभागाला केला आहे.
पत्नीच्या मृत्यूनंतर नुकसान भरपाई
पॅन अमेरिकन वर्ल्ड कंपनीच्या विमान अपहरणादरम्यान, मृत्यू झालेल्या महिलेच्या पतीने याप्रकरणी याचिका दाखल केली होती. कल्पेश दलाल असे या याचिकार्त्याचे नाव असून, या याचिकाकर्त्याला त्याच्या पत्नीच्या मृत्यूप्रकरणी सुमारे 20 कोटींची नुकसानभरपाई मिळाली होती.
यावरही कर आकारला जातो का?
त्यानंतर प्राप्तीकर विभागाने त्याला नोटीस पाठवली. नुकसान भरपाईच्या रकमेवर कर आकारला जाऊ शकत नाही, असा दावा दलाल यांनी केला. प्राप्तीकर कायद्यानुसार, नुकसान भरपाईच्या पैशावरही कर आकारला जातो का? असा प्रश्नही गुजरातच्या उच्च न्यायालयाने प्राप्तीकर विभागाला केला आहे.
( हेही वाचा: एसटी कर्माचा-यांचा संप थांबलाच पाहिजे, सरकारने उचलले ‘हे’ पाऊल! )
भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश
न्यायाधीश जे. बी. पारडीवाला आणि न्यायाधीश निशा ठाकोरे यांच्या खंडपीठाने प्राप्तीकर विभागाला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी आता 14 तारखेला पुढील सुनावणी होईल.