18 ते 44 वयोगटासाठी सुरू होऊ शकते ऑफलाईन नोंदणी! काय आहे आरोग्य मंत्रालयाचा निर्णय?

आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना काही अटींच्या आधारे प्रत्यक्ष लसीकरणासाठी(ऑफलाईन) नोंदणी करता येणार आहे. 

1 मे 2021 पासून 18 ते 44 वर्षे वयोगटासाठी राष्ट्रीय कोविड-19 लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींना फक्त कोविन पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने लसीकरणासाठी नोंदणी करता येत आहे. लसीकरण केंद्रांवर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण अनेक राज्यांनी केलेल्या मागणीमुळे आता 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींना काही अटींच्या आधारे प्रत्यक्ष लसीकरणासाठी(ऑफलाईन) नोंदणी करता येणार आहे.

18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाबाबत राज्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला विविध सादरीकरणे दिल्यानंतर आणि प्रतिसादात्मक माहिती पुरवल्यानंतर, केंद्र सरकारने आता कोविन डिजिटल पोर्टलवर 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी प्रत्यक्ष लसीकरणाच्या वेळी, तसेच सहयोगी सुविधांच्या माध्यमातून नोंदणी करण्याची सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे.

या मुद्द्यांचा विचार

  • ऑनलाईन नोंदणी केलेले लाभार्थी काही कारणाने लसीकरणासाठी येऊ शकले नाहीत, तर लसींचे काही डोस शिल्लक राहतात. त्यामुळे लस वाया जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी, प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावर नोंदणी करुन काही लाभार्थ्यांना लस देणे गरजेचे असते.
  • ज्या लोकांना सुलभीकृत सहयोगी केंद्रांची सुविधा गरजेची आहे तसेच ज्यांच्याकडे इंटरनेट किंवा स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन नाहीत, अशा लोकांचे अजूनही लसीकरण होऊ सकलेले नाही.

सरकारी लसीकरण केंद्रांसाठी खास सुविधा

म्हणूनच, 18 ते 44 वर्षे वयोगटातील व्यक्ती प्रत्यक्ष लसीकरणासाठी गेल्यानंतर, त्या केंद्रावर नोंदणी तसेच वेळनिश्चिती करण्यासाठी कोविन अॅपमध्ये आता एक नवीन सुविधा असणार आहे. मात्र, सध्या ही सुविधा फक्त सरकारी कोविड प्रतिबंधक लसीकरण केंद्रांवरील लसीकरणासाठी वापरणे शक्य होणार आहे. खासगी केंद्रांना केवळ ऑनलाईन वेळनिश्चिती कालावधीसह त्यांच्या लसीकरणाचे वेळापत्रक जाहीर करावे लागेल.

राज्य सरकारांना आरोग्य मंत्रालयाच्या सूचना

ही सुविधा राज्यांना सरकारांनी त्याच्या वापरास मंजुरी दिल्यानंतरच वापरता येईल. लस वाया जाऊ नये म्हणून हाती घेण्याचा अतिरिक्त उपक्रम आणि 18 ते 44 वर्षे वयोगटातील पात्र लाभार्थ्यांचे सुलभतेने लसीकरण केले जावे, याचा विचार करुन प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावरील किंवा सहयोगी संस्थांच्या माध्यमातून नोंदणी करण्याची सुविधा कधी सुरू करायची, याचा निर्णय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांनी घ्यायचा आहे. या संदर्भात, प्रत्यक्ष लसीकरण केंद्रावरील किंवा सहयोगी संस्थांच्या माध्यमातून नोंदणी सुविधा वापरण्याची पद्धत आणि मर्यादा याबाबत राज्य सरकारांनी घेतलेल्या निर्णयांची कडक अंमलबजावणी करण्यासाठीच्या स्पष्ट सूचना सर्व जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांना देण्यात याव्यात, असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here