पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देश पातळीवर साजरा केला जाणार आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांनी पंतप्रधानांचा वाढदिवस ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना पक्षाच्या सर्व खासदारांना नुकत्याच दिल्या आहेत. मोदी १७ सप्टेंबर रोजी ७४ व्या वर्षात पदार्पण करणार आहेत.
भाजपातील सूत्राने नाव न छापण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७४ वा वाढदिवस देशव्यापी कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्याची योजना भाजपने आखली आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांतील विधानसभेची निवडणूक आणि आठ महिन्यांनंतर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेचे संकटमोचक म्हणून सादर करणे हा यामागचा हेतू होय, असे सूत्राचे म्हणणे आहे.
(हेही वाचा – Prime Minister : तीन महिन्यापासून औषधांसाठी क्षयरोगींचे पंतप्रधानानां पत्र)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातच्या वडनगर येथे १७ सप्टेंबर १९५० रोजी झाला होता. येत्या १७ तारखेला ते वयाची त्र्याहत्तरी पूर्ण करून ७४ व्या वर्षात पदार्पण करतील. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख जेपी नड्डा यांनी अलिकडेच खासदारांची व्हर्च्युअल बैठक बोलाविली होती. यात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करण्यात यावा. याची सुरवात १७ सप्टेंबरपासून सुरू होईल आणि २ ऑक्टोबर, महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरू राहील. या काळात रक्तदान शिबिर आणि स्वच्छता मोहिमेसह लोकांच्या समस्येशी संबधित कार्यक्रमांचे आयोजन केले जावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र लोकांकडे कार्ड नसल्यास त्यांना ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत शिवाय ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेद्वारे लोकांशी संवाद साधण्यास आणि गावांना भेटी देण्याच्या सूचना सुध्दा खासदारांना करण्यात आल्या आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community