मुंबई सुशोभिकरण प्रकल्पाच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमावरच सुमारे दीड कोटींचा खर्च

136

मुंबई महापालिकेच्यावतीने सुशोभिकरणाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली असून या कामांचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते पार पडले. विशेष म्हणजे या प्रकल्प कामांच्या शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई महापालिकेच्यावतीने शहरातील सुशोभिकरणाच्या कामांचा शुभारंभ गेट वे ऑफ इंडियाजवळील परिसरात प्रथम शहराचे पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर उपनगरातील सुशोभिकरणाच्या भूमिपुजनचा कार्यक्रम अंधेरी शहाजी राजे क्रीडा संकुलात पार पडला आणि त्यानंतर सुशोभिकरणातील काही कामे आणि रस्ते विकास प्रकल्पांच्या कामांचा शुभारंचा कार्यक्रम चेंबूर येथील टिळक मैदानात पार पडला.

(हेही वाचा दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल अडचणीत; सीबीआयकडून समन्स)

या सुशोभिकरण व रस्ते विकास कामांच्या भूमिपुजन शुभारंभाचा कार्यक्रमासाठी तब्बल सुमारे ४४ लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. यामध्ये उद्घाटनाच्या तात्पुरत्या मंडपासह कुंपण उभारण्यासाठी सुमारे २५ लाख रुपये तर डिजिटल व्यवस्था, एलईडी स्क्रीन, ध्वनी व्यवस्था, व्हिडीओ व्यवस्था, सोशल मिडिया कनेक्टिव्हिटी आदींसाठी सुमारे १९ लाख अशा प्रकारे खर्च करण्यात आला. ही कामे अनुक्रमे राणे मंडप डेकोरेटर्स आणि साई गणे एंटरप्रायझेस यांना एम पश्चिम विभागाच्यावतीने देण्यात आली होती.

तर शहरातील सुशोभिकरणाच्या कामांसाठीही सुमारे ४० लाख रुपये आणि उपनगरातील अंधेरीच्या कामांसाठी ४० ते ४५ लाख रुपये खर्च झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या सुशोभिकरणाच्या भुमिपुजनाच्या कार्यक्रमावरच तब्बल दीड कोटींच्या आसपास खर्च झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई सुशोभिकरण प्रकल्पांतंर्गत पहिल्या टप्प्यात ५०० कामे आणि दुसऱ्या टप्प्यात ३२० व इतरही अतिरिक्त अशाप्रकारे १ हजार ०७७ कामे हाती घेतली होती. त्यातील ६१३ कामे पूर्ण झाली असल्याचा दावा महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.