आरेत बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा बळी गेल्यानंतर बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास एका बिबट्याला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. पहाटे पाचच्या सुमारास मॉडर्न बेकरी परिसरातील पशुसंवर्धन दवाखान्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे वनाधिकाऱ्यांनी पाहिले. बिबट्याला तातडीने बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात नेण्यात आले. बिबट्याची ओळख पटणे अजून बाकी आहे.
(हेही वाचा – शेतकऱ्यांनी साजरी केली वर्षावर दिवाळी; मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब केले औक्षण)
सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या पहाटे आरेतील युनिट क्रमांक 15 येथे बिबटयाचा इतिका लोट या चिमुकलीवर हल्ला झाला होता. पहाटे सहाच्या सुमारास आईसोबत नजीकच्या मंदिरात जाणाऱ्या इतिकावर बिबटयाचा हल्ला झाला होता. आईसह नजीकच्यांनी आरडाओरड सुरु केली. तासभर इतिकाला शोधण्याचे काम सुरु होते. अखेरीस इतिका नजीकच्या जंगल भागात सापडली. इतिकाला तातडीने मरोळ येथील सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले गेले. उपचारादरम्यान इतिकाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर लोकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
बिबट्याला पकडण्यासाठी आरेत दोन पिंजरे वनाधिकाऱ्यांनी लावले होते. त्यापैकी एका पिंजऱ्यात बिबट्या अडकला. पहाटे पाच वाजता मॉडर्न बेकरी परिसरातील पिंजरा वनाधिकाऱ्यांनी तपासला असता त्यात एक बिबट्या अडकल्याचे दिसले. बिबट्या रात्रीच पिंजऱ्यात अडकला असावा, असा अंदाज त्यांनी बांधला. बिबट्याचा हल्ला वाढू नये म्हणून वनविभागासह वाईल्डलाईफ वेल्फेर असोसिएशन तसेच रेस्किंग असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेर या प्राणीप्रेमी संस्था वनाधिकाऱ्यांना सहकार्य करत होत्या.
Join Our WhatsApp Community