सोमवारी लक्ष्मीपूजनाच्या पहाटेला आरेत दीड वर्षांच्या मुलीचा बळी घेणाऱ्या बिबट्याला ओळखण्यासाठी वनविभागाची ओळख परेड सुरू झाली आहे. बुधवारी पहाटे जेरबंद झालेला बिबट्या सी-55 हा इतिका लोट या दीड वर्षांच्या मुलीवर हल्ला करणारा आहे की नाही, या ठाम मतावर वनविभाग अजून पोहोचलेले नाही. सी-55 आणि सी-56 या दोन सख्खी भावंड असलेल्या बिबट्यांचा हल्ला झालेल्या ठिकाणी वावर वनाधिका-यांना दिसून आला आहे. त्यापैकी सी-55 ला बुधवारी सकाळी पकडण्यात आले.
बिबट्या जेरबंद
बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे संचालक आणि वनसंरक्षक तसेच ठाणे वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक (अतिरिक्त) जी. मल्लिकार्जुन यांनी बुधवारी पकडलेला तीन वर्षांचा नर बिबट्या सी-55 हाच हल्लेखोर बिबट्या असल्याबाबत खात्री दिली नाही. हल्ला झाला त्यावेळी युनिट क्रमांक 15 येथे दोन बिबट्यांचा वावर होता. त्यापैकी सी-55 असे नाव असलेला बिबट्या बुधवारी पकडला गेला. सी-56 हा बिबट्या अजूनही आरेत असल्यामुळे अजूनही धोका कायम असल्याचे सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः आरेत बिबट्या जेरबंद, वनविभागाला यश)
बिबट्या शारीरिकदृष्ट्या सुदृढ
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याला आणल्यानंतर त्याची शारीरिक तपासणी केली गेली. तपासणी अहवालात बिबट्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असल्याचे जी. मल्लिकार्जुन यांनी सांगितले. हा बिबट्या उद्यानातच काही काळ ठेवला जाईल. मात्र, निश्चित काळाबाबत त्यांनी माहिती दिली नाही. इतिकावर हल्ला केलेला दुसरा संशयित बिबट्या सी-56 अजूनही आरेत वावरत आहे. त्यामुळे वनाधिकाऱ्यांची या बिबट्यावरही नजर आहे.
वनविभागाचे आवाहन
मुलीवर हल्ला झालेल्या युनिट क्रमांक 15 येथे आता 30 कॅमेरा ट्रॅप लावल्यात आले असून, या बिबट्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे मल्लिकार्जुन म्हणाले. सी-56 च्या हालचाली संशययास्पद दिसून आल्या की तातडीने आवश्यक ती पावले उचलली जातील, अशी माहिती वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दिली आहे. बुधवारी भाऊबीजेच्या निमित्ताने फटाके आरेतील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आजही फटाके फोडले जातील. लहान मुलांना सायंकाळनंतर आणि पहाटे घराबाहेर पाठवू नका, असे आवाहन वनविभागाने पालकांना केले आहे.
Join Our WhatsApp Community