राज्यातील कोणत्याही भागातील नागरिकाला कोणत्याही दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी करता येण्यासाठी ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ संकल्पना राबविण्यात येणार आहे. तसेच घरबसल्या नागरिकांना दस्त नोंदणी करण्यासाठी महसूल विषयक काही दस्त नोंदणीसाठी फेसलेस प्रणाली राबविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बुधवारी येथे सांगितले.
पुढील १०० दिवस आराखड्याच्या अनुषंगाने फडणवीस यांनी आज महसूलसह वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न आणि औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क आदी विभागांचा आढावा घेतला. त्यावेळी बोलताना फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी महसूल विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नव्या योजनांचे सूतोवाच केले. राज्यातील जमीन मोजणीसाठी जीआयएस तंत्रज्ञानावर आधारित ई – मोजणी राज्यात लागू करण्यात येणार आहे. पासपोर्ट कार्यालयाप्रमाणे भूमी अभिलेख विभागातील सर्व सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी प्रथम टप्प्यात ३० कार्यालयांमध्ये भू प्रमाण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
राज्यातील ग्रामीण भागातील वडिलोपार्जित जमिनीवर स्थायिक असलेल्या लोकांना आता त्यांच्या जमिनीचे स्वामीत्व अर्थात मालमत्ता कार्ड मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण स्वामीत्व योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत गावातील मिळकतींचे ड्रोनद्वारे जीआयएस सर्वेक्षण आणि गावठाण भूमापन करण्यात येणार आहे. पीएम किसान नोंदणीकृत शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक तयार करण्यात येणार आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले. जनतेला वाळू सहज उपलब्ध होण्यासाठी सुलभ वाळू धोरण आणण्यात येईल. तसेच लवकरच भूसंपादन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असून यासाठी पोर्टल तयार करण्यात येणार असल्याचे फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
(हेही वाचा वक्फच्या नावाने बळकावलेल्या जमिनी ताब्यात घेऊन त्यावर गरिबांसाठी घरे बांधणार; CM Yogi Adityanath यांची घोषणा)
शासकीय रुग्णालयात दर्जेदार सेवा द्या
शासकीय रुग्णालयात रुग्णांसाठी अधिकाधिक सेवा अद्यावत करून त्या अधिक दर्जेदार द्याव्यात. वैद्यकीय शिक्षण अंतर्गत असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थांचे बळकटीकरण करा. औषध आणि अन्नपदार्थ मधील भेसळीला प्रतिबंध करण्यासाठी काटेकोर उपाययोजना करावी. भविष्यातील आव्हाने ओळखून प्रशासन गतिमान करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी केल्या.
रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर द्यावा
राज्य सरकार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून रुग्णसेवा देत असते. आरोग्य विभागाच्या विविध योजनांमधून आणि पुढील आराखड्यामध्ये रुग्ण केंद्रित आरोग्य व्यवस्था निर्माण करण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश देवेंद्र फडणवीस यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत दिले. आरोग्य विभागाच्या सर्व आरोग्य यंत्रणेतील घटकांचे पुढील दिवसात मूल्यमापन चांगल्या संस्थांकडून करण्याच्या सूचनाही त्यांनी (CM Devendra Fadnavis) यावेळी दिल्या.
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महसूल वाढीवर भर द्यावा
राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा महत्वाचा विभाग आहे. महसूल वाढविण्यासाठी विभागाने नवनवीन संकल्पना अंमलात आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने महसूल वाढवण्यावर भर द्यावा, असे निर्देश फडणवीस यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बैठकीत दिले. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विविध कार्यप्रणालीमध्ये अत्याधुनिक साधनसामुग्रीचा वापर करण्यात यावा. मद्यार्क वाहतूक करणाऱ्या वाहनावर डिजिटल लॉक बसविण्याची कार्यवाही करावी. तसेच गुन्हेगारांना वचक बसावा या पद्धतीने कार्यप्रणाली आखण्यात यावी. अवैधरित्या मद्य निर्मिती, वाहतूक आणि विक्रीला आळा घालण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी विभागाला केल्या.