One Stop Centre मधून अत्याचारग्रस्त महिलांना सक्षम बनवणार; अन्नपूर्णा देवी यांची कोल्हापूरमधील सेंटरला भेट

53
One Stop Centre मधून अत्याचारग्रस्त महिलांना सक्षम बनवणार; अन्नपूर्णा देवी यांची कोल्हापूरमधील सेंटरला भेट
One Stop Centre मधून अत्याचारग्रस्त महिलांना सक्षम बनवणार; अन्नपूर्णा देवी यांची कोल्हापूरमधील सेंटरला भेट

अत्याचारग्रस्त महिलांना येणाऱ्या अडचणी दरम्यान आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याच्या उद्देशाने आपत्कालीन प्रतिसाद, वैद्यकीय सहाय्य, कायदेशीर मदत, समुपदेशन आणि तात्पुरता निवारा अशा सर्व बाबी एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटरची स्थापना केली आहे. संकटात असलेल्या महिलांच्या गरजा पूर्ण करणे तसेच अत्याचारग्रस्त महिलांना आर्थिक, सामाजिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम बनवण्याचा उद्देश वन स्टॉप सेंटरचा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री, अन्नपूर्णा देवी (Annapurna Devi) यांनी केले. त्यांनी कोल्हापुरातील (Kolhapur) सखी वन स्टॉप सेंटरला (One Stop Centre) भेट देऊन तेथील कामकाजाचा आढावा घेतला.

(हेही वाचा – Mumbai Water Cut : तानसा जलवाहिनीवर पाणी गळती; ‘या’ विभागांचा पाणीपुरवठा बाधित)

त्या म्हणाल्या, विविध प्रकारच्या अत्याचाराचा सामना करणाऱ्या महिलांना आधार देण्यासाठी तयार केलेल्या विविध सरकारी योजनांच्या माध्यमातून त्यांना जगण्याचा नवा मार्गही याठिकाणी मिळू शकतो. यावेळी सोबत खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाइंगडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी शिल्पा पाटील, केंद्रप्रशासक निलम धनवडे आदी मान्यवर उपस्थित होते.

वन स्टॉप सेंटरमध्ये अत्याचारग्रस्त महिलांना मदत दिली जाते. या ठिकाणी तातडीची मदत म्हणून आवश्यक असल्यास पाच दिवस महिलांना निवाराही दिला जातो. त्यांच्या गरजेनुसार आरोग्यसेवा, कायदेशीर मदत तसेच पोलीस मदतही मिळते. या ठिकाणी वादविवाद सोडवण्यासाठी समुपदेशनही केले जाते. टोल फ्री क्रमांक 181 वर अशा अत्याचारग्रस्त महिलांनी तक्रार देऊन मदत मागितल्यास वीस मिनिटांमध्ये आवश्यक सहकार्य करण्यास सुरुवात केली जाते. कोल्हापूर येथील वन स्टॉप सेंटर चांगल्या प्रकारे कार्यरत असून येथील कामाला अजून गती देत या सेंटरचा प्रचार प्रसार सर्व स्तरापर्यंत करावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. महिला बाल विकास विभागामार्फत महिलांबरोबर मुलांसाठीही वेगवेगळ्या योजना राबविल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या देशभर पोषण कार्यक्रम चांगल्या प्रकारे राबविण्यात येत आहे. अंगणवाडीस्तरावर पोषण आणि शिक्षण असे दुहेरी काम केले जात असून यासाठी अंगणवाडी सेविकांचा विशेष प्रशिक्षण कार्यक्रमही सुरू करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

कुपोषणमुक्त भारत हे आपले उद्दिष्ट असून यासाठी मुलांना चांगले पोषण दिले, तरच येणाऱ्या काळात आपण विकसित भारत हे आपले स्वप्न पूर्ण करू शकू असे त्या म्हणाल्या. प्रत्येक जिल्ह्यात वन स्टॉप सेंटरची संख्या एकच असते. मात्र, त्या जिल्ह्याची आवश्यकता पाहून आणि त्याबाबतचा प्रस्ताव मिळाल्यानंतर मंत्रालय स्तरावर याबाबत दुसरे सेंटरही सुरू करण्यास परवानगी दिली जाते असे त्यांनी सांगितले. या चर्चेदरम्यान उपस्थित खासदार महोदयांनी केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांच्याकडे अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीबाबतही चर्चा केली.

महिलांसाठीच्या वसतिगृहासाठी प्रस्ताव

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी असलेल्या वसतिगृहसाठीच्या योजनेअंतर्गत जिल्हयात 4 वसतीगृह आहेत. अलिकडेच 50 महिलांच्या क्षमतेच्या व भाडेतत्वावर जागा असलेल्या पाचव्या वसतिगृहासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. उपस्थित सर्व खासदार यांनी याबाबत जिल्ह्यात प्रशस्त वसतिगृहासाठी मागणी केली. त्यानूसार 400 पेक्षा जास्त क्षमता असलेल्या वसतिगृहासाठी जागा निश्चित करून नव्याने प्रस्ताव देण्यात येणार आहे. तसेच याबाबत तमिळनाडु मधील नोकरी करणाऱ्या महिलांसाठीच्या आदर्श वसतिगृहाची पाहणी करून त्याप्रमाणे याही ठिकाणी उभारणी करता येईल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी दिली. यासाठी महिला व बालविकास अधिकारी यांना सुधारीत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. (One Stop Centre)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.