राणीबागेत आता ऑनलाईन तिकीट नोंदणी : अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते लोकार्पण

144

मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय पाहण्यासाठी उडणारी झुंबड लक्षात घेता तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याचा वेळ न दवडता थेट प्राणिसंग्रहालयात जाऊन पर्यटकांना आनंद घेता यावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाने ऑनलाईन तिकिट नोंदणी प्रणाली सुरु केली आहे. या प्रणालीचा शुभारंभ महापालिका अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

( हेही वाचा : एसटीच्या ताफ्यात पाच हजार इलेक्ट्रिक गाड्या; तिकिटदर कमी, प्रवाशांना मिळणार ‘या’ दर्जेदार सुविधा! )

महानगरपालिकेचे वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय ( पूर्वाश्रमीचे व्हिक्टोरिया गार्डन) चे उद्घाटन लेडी कॅथरीन फ्रिअर यांच्या हस्ते १९ नोव्हेंबर १८६२ रोजी भायखळा येथे करण्यात आले होते. हे उद्यान महानगरपालिकेकडे सुपूर्द झाल्यानंतर सार्वजनिक उद्यान म्हणून त्याच्या संपूर्ण देखभालीची जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारली. तेव्हापासून आजवर सातत्याने हे उद्यान व प्राणिसंग्रहालय जनसामान्यांचे विशेष पसंतीचे ठिकाण ठरले आहे. प्राणिसंग्रहालयाचे नूतनीकरण करून या ठिकाणी विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन प्रदर्शनी देखील निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातून येणाऱया पर्यटकांचे विशेषतः लहान मुलांचे हक्काचे आकर्षण ठरले आहे.

या प्राणिसंग्रहालयाचा शतकोत्तर हीरक महोत्सव मागील वर्षभर निरनिराळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. यामध्ये, १६० वर्षांनिमित्त शतकोत्तर हीरक महोत्सवाचे बोधचिन्ह अनावरण, पर्यटकांसाठी प्राणिसंग्रहालयात आकर्षक आसने तसेच बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांसाठी हेरिटेज वॉक, गांडूळखत विक्री तसेच प्राणिसंग्रहालयाच्या विविध समाजमाध्यम (सोशल मीडिया) अॅपचे क्यूआर कोड प्रदर्शन यासारख्या काही उपक्रमांचा उल्लेख करता येईल.

या शतकोत्तर हीरक महोत्सव सांगता समारंभ १८ नोव्हेंबर २०२२ प्राणिसंग्रहालयातील थ्रीडी प्रेक्षागृहामधे संपन्न झाला. अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपायुक्त(उद्याने) किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

ऑनलाईन तिकीटसाठी या लिंकवर करा नोंदणी

प्राणिसंग्रहालयामध्ये प्रवेशासाठी तिकिट रांग न लावता घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने तिकिट घेता यावे याकरिता ऑनलाईन तिकिट प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले. त्यादृष्टीकोनातून पर्यटकांना अवगत करण्यासाठी परिसरात सर्वत्र क्यू आर कोड प्रदर्शित करण्यात येत आहेत. https://themumbaizoo-ticket.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करुन मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर पर्यटकांना ही तिकिट नोंदणी करता येईल.

‘मी राणीबाग बोलतेय’ दृकश्राव्य चित्रफितीचे प्रकाशन

प्राणिसंग्रहालयाच्या ‘व्हर्च्युअल वाईल्ड’ या मालिकेचा शेवटचा भाग ज्यामध्ये पूर्वीच्या राणीबागेच्या स्थापनेपासून ते आजच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयापर्यंतचे स्थित्यंतर दाखवण्यात आले आहे. या दृकश्राव्य चित्रफित निमित्ताने प्राणिसंग्रहालयाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचत असून प्राणिसंग्रहालयातील महत्वकांक्षी आधुनिकीकरण प्रकल्पातील ठळक घडामोडींवर प्रकाश टाकण्‍यात आला आहे. या भागाचे प्रक्षेपण प्राणिसंग्रहालयाच्या ‘द मुंबई झू’ (The Mumbai Zoo) या यूट्यूब चॅनल (YouTube Channel) वर उपलब्ध आहे.

बालदोस्तांसाठी ‘निघाली प्राण्यांची मजेदार वरात’या पुस्तकाचे प्रकाशन

प्राणिसंग्रहालय हे लहान मुलांचे अत्यंत आवडीचे ठिकाण ठरले आहे. येथील वन्यप्राणी-पक्षी, खेळाची उपकरणे, मोठमोठे वृक्ष, बागा यांचा मुले नेहमीच आनंद घेतात. वाघ, बिबट्या, हत्ती, माकडं आदी वन्यप्राणी तसेच विविध पक्षी पाहणे, त्यांच्या विविध हालचाली, लकबी हे मुलांचे प्रमुख आकर्षण ठरते. बागा, झोपाळे येथे देखील विशेष गर्दी होते. या सर्व बालदोस्तांसाठी पर्यावरण स्नेही केटी बागली आणि मेधा राजाध्यक्ष लिखित ‘निघाली प्राण्यांची मजेदार वरात’ या मराठी पुस्तकाचे व त्याच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन करण्यात आले. प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राणी विश्वातील काही करामती, गंमती-जमती या कवितांमधून बालमित्रांना वाचावयास मिळतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.