मुंबईत केवळ २७ कोविडचे रुग्ण : कोविडच्या लसीची मात्रा लागू

111

मुंबईत सोमवारी दिवसभरात केवळ २७ रुग्ण आढळून आले असून कोविडचा प्रादुर्भाव झाल्यानंतर वाढलेल्या रुग्ण संख्येनंतरही सर्वात कमी झालेली ही संख्या असल्याचे बोलले जात आहे. रविवारी हा रुग्णांचा आकडा ४४ एवढा होता. दिवसभरात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. दिवसभरात १० हजार ६९३ चाचण्या केल्यानंतर २७ रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील कोविड प्रतिबंधक लसीची मात्रा चांगल्याप्रकारे लागू पडल्याचे दिसून येत आहे. एका बाजुला ओमायक्रॉनचा विषाणूमुळे युरोपियन देशांमध्ये थैमान घातलेले असताना मुंबईसह राज्यात हा आजार योग्यप्रकारे नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे.

रुग्णांची संख्या १२४ एवढी झाली

मुंबईत सोमवारी दिवसभरात २७ रुग्ण आढळून आले असून त्यातील २२ रुग्ण हे लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. दिवसभरात ५ रुग्ण हे रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांची संख्या १२४ एवढी झाली आहे. आजपर्यंत ऑक्सिजन बेडवरील रुग्णांची संख्या ४३ एवढी आहे. मुंबईतील झोपडपट्टी व इमारतींमधील सक्रिय कंटेन्मेंटची संख्या शुन्यावर आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी याबाबत बोलतांना रुग्णांची ही सर्वात कमी संख्या असून या खाली ही संख्या जाण्याचे प्रमाण कमी असेल, असे सांगितले.

(हेही वाचा मुंबईकरांनो ‘पारा’ चढणार आहे, ‘थंड’ रहा! कसे ते वाचा)

मुंबईतील ३०० केंद्रांवर हे लसीकरण

पाच राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीसाठी मुंबईबाहेर गेलेल्या आणि बाहेरुन मुंबईत येणाऱ्या पर्यटकांवर विशेष नजर आता आरोग्यसेविकांच्या माध्यमातून ठेवली जाणार आहे. जी घरे अनेक दिवसांपासून बंद होती, त्या घरांमध्ये पुन्हा कुटुंबे आल्यानंतर त्यांची चाचणी केली जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव ही चाचणी केली जाणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांची लसीकरण मोहीम १६ मार्चपासून करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबईतही याची अंमलबजावणी याच तारखेपासून केली जाणार आहे. मुंबई महापालिका या लसीकरणासाठी सज्ज असून मुंबईतील ३०० केंद्रांवर हे लसीकरण केले जाईल. मात्र याबाबतची मागदर्शक तत्वे प्राप्त झाल्यानंतर त्यानुसार ही मोहिम राबवली जाईल,असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.