मुंबईतील ६ टक्केच नागरिक पुरेशा फळे – भाज्या खातात, तर १२ टक्के मुंबईकर लठ्ठ; जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल

जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसनुसार,  दररोज किमान ४०० ग्रॅम फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने असंसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतो. मुंबईत सुमारे ९४ टक्के नागरिक  दररोज अपुरी फळे-भाज्या खात असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे, जे शिफरस केलेल्या प्रमाणापेक्षा  ५० टक्क्यांनी कमी आहे. तसेच मुंबई जागतिक आरोग्य संघटना स्टेप्स सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की, सुमारे ४६ टक्के नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे. १२ टक्के मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळले व लठ्ठपणामध्ये महिलांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळले.
असंसर्गजन्य रोग आजारात अंतर्भूत हृदयरोग, कर्करोग, मधुमेह व तीव्र श्वसनाचे विकार हे प्रामुख्याने मृत्यूचे कारण आहे. असंसर्गजन्य रोगामुळे २०१६ मध्ये जागतिक स्तरावर ४० दक्षलक्ष नोंदणीकृत मृत्यू आहे, हे प्रमाण जागतिक मृत्यूच्या एकूण ७१ टक्के असून भारतामध्ये हे प्रमाण एकूण मृत्यूंच्या ६१ टक्के इतके  आहे. यासाठी महत्वाचे कारणीभूत घटक म्हणजे तंबाखूचे वाढते प्रमाण, दारूचे व्यसन, रोजच्या आहारात फळ आणि भाज्यांचा अभाव, आहारात मिठाचा अतिवापर, चुकीची जीवनशैली आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे.
महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने जागतिक आरोग्य संघटनेच्या सहाय्याने भागीदारी करून डब्लू एच ओ स्टेप सर्व्हे (WHO STEPS SURVEY) हे सर्वेक्षण राबविले. या अंतर्गत असंसर्गजन्य रोग विभागाचे बृहन्मुंबई महानगरपालिका पथक आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली, निलसन आईक्यू इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या स्वतंत्र संशोधन संस्थेद्वारे आरोग्य संबंधित डेटा संकलन करण्यात आला. तसेच मुंबई सर्वेक्षणामधून प्राप्त निष्कर्षांना अंतिम रूप देण्यासाठी केईएम, नायर, सायन आणि कूपर यासारख्या वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांचा सहभाग मिळाला व दोन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीने, मुंबई महानगरातील सर्व २४ प्रशासकीय विभागांमध्ये, झोपडपट्टी आणि तत्सम वस्तींमध्ये लोकसंख्या आधारित आरोग्य चाचणी सर्वेक्षण करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने १८ ते ६९ वर्षे वयोगटातील व्यक्तिंच्या असंसर्गजन्य आजार विषयक धोके जाणून घेण्यात आले. स्टेप सर्वेक्षण मुंबई उपनगरासह मुंबई शहरात ऑगस्ट ते डिसेंबर २०२१ या कालावधीत तीन टप्प्यांत राबविण्यात आले. यात प्रथम टप्प्यात सामाजिक-जनसांख्यिकीय आणि वर्तणूक संबंधित माहितीसाठी डेटा संकलन करण्यात आला. दुसऱ्या टप्प्यात उंची, वजन आणि रक्तदाब यांचा डेटा संकलन करण्यात आला. तसेच तिस-या टप्प्यात रक्तातील ग्लुकोज आणि कोलेस्टेरॉल पातळीचे मूल्यांकन करण्यासाठी बायोकेमिकल मोजमाप करण्यात आले. सर्वेक्षण करण्यासाठी एकूण ५ हजार ९५० प्रौढांशी संपर्क साधण्यात आला, यापैकी ५ हजार १९९ प्रौढांनी सर्वेक्षणात भाग घेतला. यात २ हजार ६०१ पुरुष आणि २ हजार ५९८ महिलांचा सहभाग नोंदवण्यात आला आहे.

मुंबई STEPS सर्वेक्षणात असे निघाले  निष्कर्ष

आहाराच्या सवयी 
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारसनुसार,  दररोज किमान ४०० ग्रॅम फळे आणि भाज्यांचे सेवन केल्याने असंसर्गजन्य रोगाचा धोका कमी होतो. मुंबईत सुमारे ९४ टक्के नागरिक  दररोज अपुरी फळे-भाज्या खात असल्याचे सर्वेक्षणात आढळले आहे, जे शिफरस केलेल्या प्रमाणापेक्षा  ५० टक्क्यांनी कमी आहे.
आहारात मिठाचा वापर 
जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशीनुसार दैनंदिन जीवनात मीठ सेवन करण्याचे प्रमाण ५ ग्रॅम असावे असे नमूद करण्यात आले आहे. परंतु, सर्वेक्षणात सरासरी दैनंदिन मिठाचे सेवन ८.६ ग्रॅम इतके असल्याचे आढळून आले आहे. जे खूप  जास्त आहे.
शारीरिक व्यायाम
जागतिक आरोग्य संघटना यांनी शिफारस केल्याप्रमाणे दर आठवड्याला १५०  मिनिटांचा व्यायाम करणे आवश्यक आहे. सर्वेक्षणात जवळजवळ तीन-चतुर्थांश (७४.३ टक्के) म्हणजेच (७/१० मुंबईकर) हे त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये (योग, सायकलिंग, धावणे, चालणे, पोहणे, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट, फुटबॉल यांसारखे फिटनेस/क्रीडा-संबंधित शारीरिक हालचाली करत नाहीत असे आढळले आहे.
बॉडी मास इंडेक्स 
मुंबई जागतिक आरोग्य संघटना स्टेप्स सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की सुमारे ४६ टक्के नागरिकांचे वजन हे सरासरीपेक्षा अधिक आहे (WHO वर्गीकरणानुसार BMI 25 kg/M2 किंवा त्यापेक्षा जास्त). १२ टक्के मुंबईकर लठ्ठ असल्याचे आढळले व लठ्ठपणा महिलांमध्ये जास्त आढळला. (WHO वर्गीकरणानुसार BMI 30 kg/M2 किंवा त्या पेक्षा जास्त)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here