पर्यावरण संरक्षणासाठी तसेच नवी मुंबई परिवहन उपक्रमास होणारा तोटा कमी करण्याच्या दृष्टीने नवी मुंबईत शनिवार -रविवारी फक्त विद्युत बसगाड्यांचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे इंधन खर्चात कपात होणार असून, पर्यावरणपूरक शहर ठेवण्यासाठी याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच शहरात लवकरच प्रदूषण मापक केंद्र सुद्धा उभारले जाणार आहे.
( हेही वाचा : शिमग्याक जातास? रेल्वेने सुरू केल्या या विशेष गाड्या )
वीकेंण्डला फक्त विद्युत बस
रशिया-युक्रेन युद्धामुळे दिवसेंदिवस पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत तसेच दोन वर्ष लॉकडाऊनमुळे एनएमएमटी बससेवेला मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे. यावर उपाय म्हणून विद्युत बसगाड्यांचा वापर केला जाणार आहे. इंधनाचा वापर कमी करून इंधन बचत व खर्च कमी करण्यासाठी शून्य दिवस उपक्रम राबवला जात आहे. शनिवार-रविवारी नवी मुंबईच्या रस्त्यांवर शून्य इंधन दिवस या उपक्रमाअंतर्गत, फक्त विद्युत बस धावणार आहेत. सध्या एनएमएमटीच्या ताफ्यात १५० बस आहेत. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई शहरात वीकेंण्डला केवळ विद्युत बस धावतील असा निर्णय एनएमएमटीने घेतला आहे.
प्रदूषणाची पातळी तपासणे सहज शक्य
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने नवी मुंबई महापालिका हद्दीत उभारण्यात आलेल्या हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणाऱ्या केंद्रांचे काम अंतिम टप्प्यात आले असून, या आठवडाभरात हे केंद्र कार्यान्वित होणार आहेत. या गुणवत्ता मोजमाप केंद्रामुळे हवेच्या प्रदूषणाची पातळी तपासणे सहज शक्य होणार आहे.
Join Our WhatsApp Community