मुंबई महापालिकेच्यावतीने तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी यापूर्वी विशेष रुग्णालयांमध्ये हाती घेण्यात आलेल्या १२ ठिकाणी, १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम हाती घेतले आहेत. पण दोन महिने उलटले तरी केवळ ९ ऑक्सिजन प्लांटची उभारणी झाल्याची माहिती समोर आली आहे. या १६ प्लांटची उभारणी कार्यादेश दिल्यापासून एका महिन्याच्या आत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु दोन महिने उलटत आले तरी कंत्राटदाराला हे प्लांट उभारता आलेले नाहीत. त्यामुळे कंत्राटदाराला ५ टक्के दंड आकारण्यात आला आहे. प्रशासनाने दंड आकारला असला तरी प्रत्यक्षात हे प्लांट उभे न राहिल्यास आणि तिसऱ्या लाटेमध्ये कार्यान्वित न झाल्यास, त्यामुळे जर रुग्णांचे बळी गेले तर त्याला जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित होत आहे.
(हेही वाचाः मुंबईत १२ रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांट कधी होणार सुरू?)
भाजप नगरसेवकांनी केला सवाल
मुंबई महापालिकेच्या सर्व जंबो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मंजुरीला आला असता, तो प्रस्ताव एकमताने स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. भाजपचे विनोद मिश्रा यांनी या ऑक्सिजन प्लांटचा उपयोग आयसीयू रुग्णांसाठी होणार का, असा सवाल करत आजवर आम्ही ऑक्सिजन प्लांटवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होतो. पण आता राज्याचे मंत्री अस्लम शेख यांनीही ऑक्सिजन प्लांटमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आयुक्तांना पत्र लिहून केल्याची आठवण करुन दिली. तर भाजपच्या ज्योती अळवणी यांनी जुलै महिन्यात जर हे प्लांट उभे करायचे होते आणि ते जर झाले नसतील तर आपण तिसरी लाट आली तर त्याचा वापर कसा करणार, असा सवाल केला.
(हेही वाचाः मुंबईतील जंबो कोविड सेंटरमधल्या ऑक्सिजन प्लांटचा खर्च झाला कमी)
जागांची स्वच्छता करावी
कांदिवलीतील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट बनवण्यात आला असून, तो अद्यापही कार्यान्वित झाला नसल्याची बाब भाजपचे कमलेश यादव यांनी निदर्शनास आणून दिली आहे. भाजपचे भालचंद्र शिरसाट यांनी ऑक्सिजन प्लांट बनवण्याच्या जागा अडगळीच्या असून प्रशासनाने अशा जागा साफ करुन, प्रकल्प उभारणीसाठी उपलब्ध करुन द्यायला हव्यात, असे सांगितले. दहिसर येथील कांदळपाडा येथील ज्या जागी ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार आहे, त्या जागेची साफसफाई करताना तिथे अजगर सापडल्याची माहिती समितीला दिली. तर भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी जे १६ प्लांट झाले नाहीत, त्याचा कालावधी पुन्हा वाढणार नाही याची काळजी घेऊन प्रशासनाने कामे करुन घ्यायला हवीत, असे सांगितले.
प्रस्तावाला मंजुरी
प्रशासनाच्यावतीने उत्तर देताना अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी विशेष रुग्णालयांमध्ये जे १६ ऑक्सिजन प्लांट उभारण्यात येणार होते, त्यातील ९ प्लांटचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरित प्लांटचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या ऑक्सिजन प्लांटमधील ऑक्सिजनचा वापर आयसीयूसाठीही होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या या उत्तरानंतर स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी हा प्रस्ताव मंजूर करत ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीचा मार्ग मोकळा केला आहे.
(हेही वाचाः ऑक्सिजन प्लांट उभारणी: सीएसआर निधी रुग्णालयांमध्ये, महापालिकेचा निधी कोविड सेंटरमध्ये)
Join Our WhatsApp Community