गेल्या काही दिवसांपासून तापमानात घट होत असून थंडीची चाहूल लागली आहे. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी पौष्टिक मेथी लाडूसह सुका मेवा अर्थात ड्रायफ्रूटसची मागणी वाढली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत अंजीर, काजूच्या (Dried Fruit) दरात वाढ झाली आहे. पिस्त्यासह बदाम, जरदाळूच्या दरात घसरण झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
यंदा पावसाळा लांबल्याने थंडी सुरू होण्यास विलंब झाला, मात्र गेल्या काही दिवसांत तापमानात घट होत आहे, तर थंडीची चाहूल लागली असून थंडीपासून बचाव करण्यासाठी आणि शरीरातील उष्णता वाढण्यासाठी सुकामेवा खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे आरोग्य संवर्धनासाठी लाभधारक ठरणाऱ्या या पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यामुळे एपीएमसीमध्ये सुकामेवा खरेदी करण्याकडे ग्राहकांची रेलचेल वाढली आहे.
(हेही वााचा – Ayodhya Shri Ram Mandir : अवघ्या देशाला रामललाच्या दर्शनाची प्रतीक्षा; डाव्यांना मात्र वावडे )
काजू, अंजीरच्या दरात वाढ…
ऊर्जा निर्माण करणाऱ्या मेथीचे तयार लाडू, सुका मेव्याचे लाडू, बदाम, काजू, अक्रोड, जर्दाळू, खोबरे, खारीक, डिंक, गोडंबी, पिस्ता, अंजीर, मेथी दाणे,इत्यादी पदार्थांना बाजारात मोठी मागणी आहे, अशी माहिती व्यापारी सुरेंद्र पटेल देतात. मेथी तसेच डिंकाच्या लाडूचे भाव स्थिर असून ६०० रुपये किलो या दराने विक्री होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत बदामाचे भाव घसरले असून काजू, अंजीरच्या दरात वाढ झाली आहे.