…तर सोसायटीतच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी! लोकप्रतिनिधींची मागणी!

प्रत्येक झोपडपट्टी परिसरातील आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना घराच्याजवळी ही सुविधा उपलब्ध होईल, असे भाजपचे आमदार अमित साटम म्हटले आहे.

मुंबईत लसीकरणाची गती वाढवण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढाकार घेताना दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मागणीनुसार १ एप्रिलपासून ४५ वयापर्यंतच्या नागरिकांना लसीकरणाची परवानगी मिळाल्याने लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिका शाळांमध्ये लसीकरण सुरु करण्याची मागणी केली आहे. तर भाजपचे आमदार अमित साटम यांनी प्रत्येक सोसायट्यांमधून १०० नागरिकांनी मागणी केल्यास तिथे लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

१ एप्रिलपासून लसीकरण केंद्रामध्ये गर्दी होण्याची शक्यता!

कोविडच्या लसीकरण मोहिमेला मुंबईत सुरुवात झाली आहे. परंतु आजवर ६० वर्षे वयापुढील आणि सहव्याधी असलेल्या ४५ वयापुढील नागरिकांना लसीकरण केले जात होते. परंतु राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मागणीनुसार ४५ वयापर्यंतच्या सरसकट १ एप्रिलपासून लसीकरणाची परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत लसीकरणाची ही मोहिम योग्यप्रकारे शिस्तीने सुरु असली तरी १ एप्रिलपासून यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना या गर्दीचा त्रास होवू नये म्हणून जवळच्या महापालिका शाळेत लसीकरण करण्यात यावे. जेणेकरून या सर्वांना घराच्या जवळ ही सुविधा उपलब्ध होईल. शिवाय अटी व नियम पाळून या लसीकरणाची गती वाढवता येईल, अशी मागणी शिवसेना नगरसेवक अमेय घोले यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

(हेही वाचा : अखेर स्थायी समितीचे दरवाजे विनोद मिश्रा यांच्यासाठी खुले!)

झोपडपट्टी परिसरात लसीकरणाची सुविधा उपलब्ध करा!

तर अंधेरी पश्चिम येथील भाजपचे आमदार अमित साटम यांनीही महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना लसीकरणासाठी पत्र लिहिले आहे. त्यामध्ये त्यांनी गृहनिर्माण सोसायटीतील १०० नागरिक लसीकरणासाठी तयार असतील तर त्यांना त्यांच्या सोसायटीत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच प्रत्येक झोपडपट्टी परिसरातील आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना घराच्याजवळी ही सुविधा उपलब्ध होईल,असे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here