BMC : विरोधी पक्षनेत्यांनाही हवे महापालिकेत कार्यालय!

उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना महापालिकेच्या वतीने मुख्यालय इमारतीत कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेल्या या कार्यालयाचा वापर भाजपच्या माजी नगरसेवकांकडून केला जात आहे.

157
BMC : विरोधी पक्षनेत्यांनाही हवे महापालिकेत कार्यालय!
BMC : विरोधी पक्षनेत्यांनाही हवे महापालिकेत कार्यालय!

मुंबईच्या शहर आणि उपनगरच्या पालकमंत्र्यांसाठी महापालिका मुख्यालयात नागरिक तक्रार निवारण कक्षच्या नावावर कार्यालय उपलब्ध करून दिल्यानंतर आता विरोधी पक्ष नेत्यांकडूनही अशा प्रकारे कार्यालय आपल्याला देण्यात यावी, अशी मागणी आता महापालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे होत आहे. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी महापालिकेत कार्यालय उपलब्ध करून घेण्याची विनंती काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केल्यानंतर मंगळवारी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांसह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आपल्यासाठीही कार्यालय उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केल्याची माहिती मिळत आहे. मात्र याबाबत कोणताही निर्णय चहल यांनी घेतला नाही. (BMC)

उपनगराचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना महापालिकेच्या वतीने मुख्यालय इमारतीत कार्यालय उपलब्ध करून देण्यात आले असून जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी केलेल्या या कार्यालयाचा वापर भाजपच्या माजी नगरसेवकांकडून केला जात आहे. लोढा यांना दिलेल्या त्या कार्यालयानंतर शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनाही महापालिकेने सभागृह नेत्यांचे दालन कार्यालय म्हणून उपलब्ध करून दिले आहे. मात्र, केसरकर यांना कार्यालय उपलब्ध करून दिले असले त्याठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक अद्यापही तिथे येत नाहीत. (BMC)

(हेही वाचा – Maharashtra Politics : वारशाचा दावा करणाऱ्यांनी आधी आरसा पहावा; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला)

दोन्ही पालकमंत्र्यांना कार्यालय उपलब्ध करून दिल्या नंतर बुधवारी मंगळवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या आमदारांसह विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. या भेटीमध्ये महापालिका रुग्णालयांमध्ये आरोग्य सेवा सुविधा तसेच डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे तसेच केईएम, शीव, नायर, सह इतर उपनगरीय रुग्णालयात अधिष्ठाता यांना दिले प्रशासकीय अधिकार पुन्हा बहाल करणे, सर्व ड्रेनेज लाईनची सुधारणा, उद्यान सुशोभीकरण आदी कामांचा ऊहापोह केला. याबरोबरच आमदारांना देण्यात येणाऱ्या विकास निधीबाबतही चर्चा करण्यात आली. यात ठाकरे गटाच्या आमदारांना महापालिकेचा हा निधी मिळाला नसल्याची तक्रार आमदारांनी केली. मात्र हा निधी मंजूर करण्याचे अधिकार पालकमंत्र्यांना असून आपण त्यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करावा असे चहल यांनी सांगितले. (BMC)

यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पालक मंत्र्यांसह विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून आपल्यालाही महापालिकेत दालन उपलब्ध करून द्यावं अशी मागणी केली. मात्र या मागणीबाबत चहल यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. काही दिवसांनी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेसच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी विरोधी पक्ष नेत्यांसाठीही महापालिकेत कार्यालय उपलब्ध करून घ्यावे अशी विनंती त्यांना केली आणि आपण अशी मागणी आयुक्तांकडे करावी असे त्यांना साकडे घातले होते. त्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांसाठी कार्यालय मिळवण्यासाठी प्रयत्नशील असताना आता अंबादास दानवे यांनीही कार्यालयासाठी मागणी केल्याने आता पालकमंत्र्यांसह विरोधी पक्ष नेत्यांचाही हट्ट वाढत असल्याचे पहायला मिळत आहे. (BMC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.