BMC : नाल्यांमधील कचरा रोखण्यासाठी फायबरच्या जाळ्या बसवण्याचा पर्याय; अतिरिक्त आयुक्तांचे ३१ मेपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचे निर्देश

578

मेट्रो रेल्‍वे, मध्‍य रेल्‍वे व्‍यवस्‍थापन यांच्‍याशी समन्‍वय साधून प्रलंबित कामे पावसाळ्यापूर्वी पूर्णत्‍वास न्‍यावीत. नाल्‍यांमधील सांडपाण्‍याच्‍या पृष्‍ठभागावर वाहणारा आणि तरंगणारा घनकचरा विशेषत: प्‍लास्‍टिक कचरा रोखण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या ठिकाणी जाळ्या बसवाव्‍यात, असे निर्देश देत अतिरिक्त आयुक्त अभिजित  बांगर यांनी दिले. येत्या ३१ मे २०२५ पर्यंत नाले स्वच्छतेची कार्यवाही पूर्ण करावी अशाही सूचना महापालिकेच्या (BMC) अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाळा येताच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आसपासच्या वस्तीतून फेकल्या जाणाऱ्या कचऱ्यामुळे त्यावर जाळ्या लावण्याची आठवण झाली आहे. त्यामुळे या जाळ्या चोरीला जाण्याची भीती व्यक्त करत याकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाला आता फायबरच्या जाळ्या बसवण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील (BMC) मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे मंगळवार, २५ मार्च २०२५ पासून सुरु करण्यात आली आहेत. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्‍प) अभिजीत बांगर यांनी पूर्व उपनगरांमध्‍ये सुरु असलेल्या नाले स्वच्छता कामांची गुरुवारी, २७ मार्च २०२५ रोजी पाहणी केली. त्‍यात शीव-पनवेल महामार्गावरील मानखुर्द नाला, देवनार नाला, लक्ष्‍मीबाग नाला, पूर्व द्रुतगती महामार्गावरील जोगेश्‍वरी-विक्रोळी जोडरस्‍ता (जेव्‍हीएलआर) येथील कल्‍वर्ट, भांडुप येथील दयानंद अँग्‍लो वेदिक (डिएव्‍ही) महाविद्यालय नाला, स्‍वातंत्र्यवीर सावरकर मार्गावरील नाला, एपीआय नाला आणि उषा  नगर नाला येथे प्रत्‍यक्ष भेट देत बांगर यांनी नाल्यांमधून गाळ काढण्याच्‍या कामांचा आढावा घेतला. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले.

भांडुपमध्ये पावसाचे पाणी यंदा तुंबणार नाही?

पाहणी दोऱ्यात पुढील टप्प्यात भांडुप रेल्वे स्थानकाजवळील गणेश मंदिर, श्रीकृष्ण मंदिर येथील कल्व्हर्टची पाहणी करण्यात आली. भांडुप रेल्वे स्थानक प्रवेशद्वार क्रमांक १ व २ समोरील या कल्व्हर्टची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत आहेत. मागील पावसाळ्यावेळी नाल्याचा प्रवाह रोखला जात होता. तो यावेळी  रोखला जाणार नाही. मात्र, भांडुप रेल्वे स्थानक हद्दीतील रेल्वे मार्गाला समांतर पावसाळी जलवाहिनीची ‘मिसिंग लिंक’ पूर्ण नसल्याने अतिवृष्टीमुळे भांडुप रेल्वे स्थानकात पाणी साचले होते. ही ‘मिसिंग लिंक’ बांधून घेण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा सुरु आहे. तूर्तास रेल्वेची पावसाळी जलवाहिनी व महानगरपालिकेची पावसाळी जलवाहिनी यामध्ये चेंबर टाकून दोन्ही जलवाहिन्या जोडाव्यात. पावसाळी पाण्याचा निचरा करण्याची तात्पुरती व्यवस्था होईल, असे नियोजन महानगरपालिकेच्या (BMC) पर्जन्य जलवाहिनी विभागाने केले आहे.

(हेही वाचा Nagpur Violence चे बांगलादेशी कनेक्शन? घुसखोर बांगलादेशी नागरिकाला अटक)

नाल्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सफाई करा

मोठ्या व छोट्या नाल्यातून गाळ काढण्याची कार्यवाही २५ मार्च २०२५ पासून सुरु करण्यात आली आहे. ३१ मे २०२५ पर्यंत निर्धारित संपूर्ण काम पूर्ण करणे अपेक्षित आहे. त्यासाठी प्रत्येक नाल्याचे एका टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत  दिवसनिहाय नियोजन करावे. नाले स्वच्छतेच्या प्रगतीचे सातत्याने निरीक्षण करण्यासाठी संगणक प्रणाली निर्माण करण्यात आली आहे. त्यात दररोज अद्ययावत माहिती भरण्यात यावी.

गाळ काढण्याच्या कामांमध्ये हयगय नाही

स्थानिक अभियंत्यांनी नाले स्वच्छतेची कामे करताना पूर्ण वेळ उपस्थित रहावे, याचाही बांगर यांनी पुनरुच्चार केला. तसेच, नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची यापुढेही पाहणी केली जाणार असून परिणामकारकपणे स्वच्छता करावी. कोणतीही हयगय खपवून घेणार नाही, असे बांगर यांनी नमूद केले. ‘एम पूर्व’ विभागाच्‍या सहायक आयुक्‍त अलका ससाणे, ‘एस’ विभागाचे सहायक आयुक्‍त भास्‍कर कसगीकर, पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाचे उपप्रमुख अभियंता सचदेव हरदीपसिंग यांच्‍यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.

नाल्याच्या बाजुची पर्जन्यजलवाहिनी बाधित

प्रारंभी, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्‍प) बांगर यांनी मानखुर्द येथील नाल्याची पाहणी केली. नाल्याच्या बाजूची २५० मीटर पर्जन्य जलवाहिनी मेट्रो कामामुळे बाधित झाली आहे. मेट्रो व्यवस्थापनाने हे काम पावसाळ्यापूर्वी सुरु करणे गरजेचे आहे. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी  मेट्रो व्यवस्थापनासमवेत समन्वय साधून हे काम पूर्ण करावे, असे निर्देश  बांगर यांनी दिले.

छोटे रस्ते जाळ्या लावून बंद करा

मानखुर्द नाल्यात मोठ्या प्रमाणात घरगुती घनकचरा तरंगताना दिसून आला. नाल्याच्या दुतर्फा दाटीवटीची वस्ती घरे असून या घरांमधून कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. नाल्यांमधील घनकचरा विशेषतः प्लास्टिक कचरा पुढे अरुंद ठिकाणी अडकून पाण्याच्या प्रवाहात अवरोध निर्माण करतात. त्यामुळे पाणी तुंबण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते. तरी शक्य त्या ठिकाणी नाल्याच्या दोन्ही बाजूस उंच जाळ्या लावणे, आवश्यक त्या ठिकाणी नाल्याकडे जाणारे गल्ली परिसरातील छोटे रस्ते जाळ्या लावून बंद करणे, या पर्यायांची चाचपणी करावी, अशी सूचना बांगर यांनी केली.

देवनार नाल्याला भंगार व्यवसायिकांचा विळखा

देवनार नाल्याच्या दुतर्फा भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्याचे निदर्शनास आले. नाल्याच्या ठिकाणी जाळी लावली असता, ती चोरीस जाण्याची शक्यता लक्षात घेवून आवश्यक त्या ठिकाणी फायबर रिइन्फोर्सड् पॉलिमरच्या जाळ्या लावाव्यात, अशा सूचना देखील बांगर यांनी केल्या.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.