कांदिवलीतील ‘त्या’ संशयास्पद लसीकरणाच्या चौकशीचे आदेश

या संशयास्पद लसीकरण प्रकारणाची चौकशी करुन ४८ तासांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृहसंकुलात झालेल्या संशयास्पद कोविड-१९ लसीकरण प्रकाराची सखोल चौकशी करुन ४८ तासांमध्ये त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश अतिरिक्त महापालिका आयुक्त(पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. दरम्यान, गृहनिर्माण संस्थांनी खासगी लसीकरण केंद्रांशी सामंजस्य करार करुन, त्यांच्या नोंदणीसह सर्व बाबींची खातरजमा करुन नंतरच लसीकरण उपक्रम राबवावा, असे आवाहनही महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

३९० जणांचे संशयास्पद लसीकरण

पश्चिम उपनगरातील कांदिवलीमध्ये एका गृह संकुलात सुमारे ३९० रहिवाशांना कोविड-१९ प्रतिबंधक लस देण्यात आली. मात्र, लसीकरण करणाऱ्या संबंधित चमूकडे लॅपटॉप आदी साधने नव्हती, तसेच लस घेतलेल्या लाभार्थ्यांना विविध रुग्णालयांच्या नावाने लसीकरण प्रमाणपत्र प्राप्त झाले. हा सर्व प्रकार संशय निर्माण करणारा असल्याने, रहिवाशांनी पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली आहे. या संशयास्पद लसीकरण प्रकारणाची चौकशी करुन ४८ तासांत त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश, सुरेश काकाणी यांनी परिमंडळ ७चे उपायुक्त विश्वास शंकरवार यांना दिले आहेत.

(हेही वाचाः मुंबईत कोरोनाचा ताप पुन्हा वाढला)

खबरदारी घेणे गरजेचे

असे संशयास्पद लसीकरण होणे, ही बाब गंभीर व अनुचित तसेच आरोग्यास धोकादायक आहे. नागरिकांनी आपल्या गृहनिर्माण संस्थेमध्ये लसीकरण करण्यापूर्वी खासगी रुग्णालय लसीकरण केंद्रांशी सामंजस्य करार करणे आवश्यक आहे. तशा मार्गदर्शक सूचना महापालिका प्रशासनाने यापूर्वीच निर्गमित केल्या आहेत. त्यानुसार आवश्यक बाबींची खातरजमा करुन खबरदारी घेणे आवश्यक आहे.

अशी करा खतरजमा

प्रत्येक खासगी लसीकरण केंद्रास कोविन प्रणालीतर्फे एक नोंदणी क्रमांक देण्यात येतो. हे लक्षात घेता, ज्या खासगी लसीकरण केंद्राच्या माध्यमातून गृहनिर्माण संस्थेमध्ये लसीकरण होणार आहे, त्या संबंधित खासगी लसीकरण केंद्राच्या नोंदणी संदर्भात नागरिकांनी व गृहनिर्माण संस्थांनी आपल्या विभागातील वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून खातरजमा करावी.

(हेही वाचाः रुग्णसेवा हाच वैद्यकीय शिक्षणाचा, व्यवसायाचा केंद्रबिंदू! सुरेश काकाणी यांचे मत)

खासगी लसीकरण केंद्रांतर्फे होणाऱ्या लसीकरणासाठी संबंधित संस्थेसोबत सामंजस्य करार करण्यासह, त्या केंद्रातर्फे लसीकरणासाठी आलेल्या कर्मचा-यांचे ओळखपत्र पडताळावे, त्या संदर्भात योग्य शहानिशा करावी. तसेच लसीकरण झाल्यानंतर लाभार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र त्वरित मिळण्याचा आग्रह करावा, असेही प्रशासनाकडून पुन्हा एकदा सूचित करण्यात येत आहे. या संदर्भात कोणत्याही संशयास्पद बाबी आढळून आल्यास आपल्या विभागातील संबंधित वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे नम्र आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here