पुणे येथील ओशो आश्रम नष्ट करण्याचे कारस्थान सुरू आहे. सर्व प्रकरणांची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी ओशो फॉरेव्हरंचे अध्यक्ष आणि चित्रपट लेखक कमलेश पांडे यांनी पत्रकार परिषदेत केली. ओशोंचा वारसा वाचविण्यासाठी संपूर्ण भारतभर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. ओशोंचा वारसा हा केवळ भारताचा वारसा नसून संपूर्ण जगाचा वारसा आहे, असे त्यांचे मत आहे.
ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी!
ओशोंनी भारताच्या हजारो वर्षे जुन्या असलेल्या अध्यात्मिक परंपरेला पुनर्जीवन देण्याचे काम केले असून, ओशोंची समाधी, ओशो संन्यासी आणि ओशो प्रेमींसाठी काशी किंवा मक्का मदीना एवढीच प्रिय आहे. आम्हाला ओशो समाधीपर्यंत जाण्यास बंदी करुन आमच्या धार्मिक अधिकारांपासून वंचित केलेले आहे. ओशोंचा फोटो काढून, त्यांच्या वक्तव्याला काटून छाटून मनमानी पद्धतीने जनतेसमोर सादर केले जात आहे. ओशोना एक रहस्यदर्शी सद्गुरु न मानता त्यांना केवळ एका लेखकाच्या स्वरूपात सादर केले जात आहे. हे कारस्थान यासाठी रचले जात आहे कि, येणाऱ्या पिढीने त्यांना विसरून जावे, असे कमलेश पांडे म्हणाले.
(हेही वाचा : बदल्यांसाठी पवारांच्या बंगल्यावरुन फोन आल्याने मंत्रालयात उडाली खळबळ)
१८०० कोटी रुपयांचा घोटाळा
ओशोंची जगभरातील वेगवेगळ्या ६० ते ७० भाषांमध्ये अनुवादित झालेली ग्रंथसंपदा या सर्वांची रॉयल्टी कुठे जात आहे? याची चौकशी व्हावयास हवी. आमची मागणी केवळ ओशोंचा आश्रम विकण्यापासून वाचविण्याची नसून या सर्व प्रकाराची सी.बी.आय व ईडीमार्फत सखोल चौकशी व्हावयास हवी, अशी मागणी कमलेश पांडे यांनी केली. ओशो फाउंडेशन इंटरनॅशनल आणि नवसंन्यास (रजनीश) फाउंडेशनचे ट्रस्टी आणि वर्तमान प्रबंधन टीमद्वारे १८०० कोटी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. या कागदपत्रांची तपासणी आपण वेबसाईटवर सुद्धा करू शकता, असे पांडे यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
ओशो रजनीश यांनी स्थापन केलेल्या या आश्रमातील ध्यान केंद्र कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर मागच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये बंद करण्यात आले आहे. सर्व सुविधांनी सज्ज असलेल्या या आश्रमात जगभरातील श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती ध्यान आणि योग करण्यासाठी येतात. मात्र, कोरोना काळात हे ध्यानकेंद्र बंद करण्यात आले. आश्रमातील आर्थिक चणचण वाढली आहे. या आश्रमातील १.५ एकर जागेचे दोन भूखंड विकण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला आहे. ज्यामध्ये एक जलतरण तलाव आणि एका टेनिस कोर्टाचाही समावेश आहे. हे दोन्ही प्लॉट बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांना विकण्याचा निर्णय फाऊंडेशनने घेतला आहे. बजाच यांचा ओशो आश्रमाला लागूनच बंगला आहे.
Join Our WhatsApp Community