27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. महाराष्ट्रभर मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जात आहे. अशातच मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून, 7 वर्षांपासून पाठपुरावा केला जात आहे. राजभाषा दिनाचे औचित्य साधून अनेक नेते आता मराठीच्या अभिजात दर्जा न मिळण्यावर भाष्य करत आहेत. यातच आता छगन भुजबळ यांनी केंद्रावर आरोप करत, मराठीला अभिजात दर्जा देण्यासाठी केंद्र दुजाभाव करत असल्याचे म्हटले आहे.
पोस्ट कार्ड पाठवण्यात आले
भुजबळ नाशिकमध्ये बोलत होते. विशेष म्हणजे यापूर्वी मंत्री सुभाष देसाई यांनीही हाच आरोप केला होता. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीची 4 हजार पोस्ट कार्ड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई याच्या उपस्थितीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पाठवण्यात आली आहेत.
( हेही वाचा: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार नाही? हे आहे कारण! )
भाषेचा दर्जा द्यावा लागेल
छगन भुजबळ म्हणाले की, मराठी भाषा अडीच हजार वर्षांपूर्वीची प्राचीन भाषा आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी 7 वर्षांपासून लढा सुरू आहे. इतर भाषांना अभिजात दर्जा मिळाला. मात्र, मराठीला का नाही. मराठी भाषेबाबत दुजाभाव केला जातोय, असा आरोप भुजबळ यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सुभाष देसाई सारेच मराठीला अभिजात दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे एक ना एक दिवस मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्यावाच लागेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याबद्दल काही माहिती नसल्याचे ते म्हणाले. नियमांप्रमाणे जी कारवाई करायची ती केली जाईल, असे सूचक वक्तव्य भुजबळांनी केले.
Join Our WhatsApp Community