घरोघरी तिरंगा अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने नागरिकांना स्वयंस्फूर्तीने राष्ट्रध्वज खरेदी करुन सहभागी होण्याचे आवाहन केले होते. परंतु, मुंबई महानगरपालिकेने स्वतः सुमारे ४० लाख राष्ट्रध्वज खरेदी केले. तर टाटा समुहाने १ लाख राष्ट्रध्वज महानगरपालिकेला दिले आहेत. असे एकूण ४१ लाख राष्ट्रध्वज तिरंगा सर्व २४ विभाग कार्यालये आणि इतर खात्यांच्या माध्यमातून मुंबईतील घरोघरी पोहोचवण्याचे कामकाज प्रशासनाने पार पाडले आहे. या ४० लाख साठ्यातील सदोष आढळलेले सुमारे ४ लाख ५० राष्ट्रध्वज देखील तातडीने बदलून संबंधित पुरवठादाराकडून उपलब्ध करुन घेण्यात आले आणि ते वितरित केले असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी नागरिकांच्या हाती सदोष ध्वजच पडले आहे.
भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी शनिवार, १३ ऑगस्ट २०२२ पासून सोमवार १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत संपूर्ण मुंबई महानगरात घरोघरी तिरंगा अर्थात हर घर तिरंगा अभियान राबवले जाणार आहे. यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतील प्रत्येक घरी याप्रमाणे एकूण राष्ट्रध्वज तिरंगा पोहोचवण्याचे काम महानगरपालिकेच्या यंत्रणेने बजावले आहे. एवढेच नव्हे तर, या अभियानात व्यापक लोकसहभाग मिळवण्यासाठी मागील पंधरवड्यात महानगरपालिकेने अतिशय व्यापक जनजागृती केली आहे.
ध्वज कसा फडकवाल…?
घरोघरी तिरंगा अभियानात सर्व मुंबईकरांनी सहभागी व्हावे, राष्ट्रध्वज तिरंगा आपल्या घरी फडकवताना केशरी रंगाची पट्टी वरच्या दिशेने तर हिरव्या रंगाची पट्टी खालच्या दिशेने अशा योग्य स्थितीत राष्ट्रध्वज फडकवावा, अभियान कालावधी संपल्यानंतर आपला राष्ट्रध्वज तिरंगा संस्मरणीय आठवण म्हणून आपल्या घरी जपून ठेवावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांनी केले आहे.
जनजागृतीवर असा दिला भर…
या अभियानासाठी महानगरपालिकेने मागील १५ दिवसांत अत्यंत मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. तसेच व्यापक लोकसहभाग मिळण्याच्यादृष्टीने वैविध्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. मुंबईत आतापर्यंत विविध ठिकाणी मिळून सुमारे साडेचार हजार बॅनर्स, ३५० होर्डिंग्ज, सुमारे १०० डिजिटल होर्डिंग्ज, दीड हजार उभे फलक (स्टॅण्डीज), ३५० बसथांबा यावर जाहिरात प्रदर्शित करण्यात आले आहेत.
चित्रपट गृहांतूनही जनजागृती…
त्यासोबत सार्वजनिक ठिकाणे, व्यापारी संकुल, विविध कंपन्यांची कार्यालये, शासकीय – निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी सांगितिक उद्घोषणा (जिंगल अनाऊंसमेंट) करण्यात येत आहे. यासोबत मुंबईतील विविध चित्रपटगृहातून चित्रपटांच्या प्रारंभी आणि मध्यंतरावेळी अभियान संदर्भातील दृकश्राव्य चित्रफित दाखविण्यात येत आहे. वृत्तपत्रीय जाहिराती आणि स्थानिक नभोवाहिन्यांमधूनदेखील नागरिकांना आवाहन करुन या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी आवाहन केले जात आहे. महानगरपालिकेच्या सर्व समाज माध्यमांवरदेखील जनजागृतीपर माहिती पुरवली जात आहे.
महापालिकेच्या ५१ शालेय इमारतींवर तिरंगा विद्युत रोषणाई…
महानगरपालिकेच्या शाळांद्वारेदेखील व्यापक प्रमाणावर उपक्रम राबवण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सहभागाने प्रभातफेरी, सामूहिक राष्ट्रगीत गायन, निबंध – चित्रकला – रांगोळी – वेशभूषा – भित्तीचित्रे – घोषवाक्ये यासारख्या स्पर्धांद्वारे घरोघरी तिरंगा अभियान संकल्पना सर्वत्र पोहोचवण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या ५१ शाळा इमारतींवर तिरंगा विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
( हेही वाचा: राणीचा कंठहार चमकणार तिरंग्याने )
महानगरपालिकेच्या उद्यान अधीक्षक कार्यालयामार्फत मुंबईतील १६५ ठिकाणी दिनांक १० ऑगस्ट २०२२ पासून अमृत महोत्सवी वृक्षारोपण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून त्यातून ३ हजार १७० वृक्ष लावण्यात येत आहेत. सर्व विभाग कार्यालयांनी देखील आपापल्या स्तरावर नागरिकांचे मेळावे, प्रभातफेरी, ठिकठिकाणी पथनाट्ये, महत्त्वाचे रस्ते आणि पूल व विद्युत खांबांवर एलईडी रोषणाई करुन परिसर सुशोभित केले आहेत. या व्यतिरिक्तदेखील वैविध्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून घरोघरी तिरंगा अभियानासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community