वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या सरकारने राज्यभरात निर्बंध लागू केलेले आहेत. नवा व्हेरिएंट ओमायक्राॅनचे रुग्ण महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. राज्यभरातील आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या २ हजार ७५९ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यातच बदत्या हवामानामुळे विविध साथीच्या आजारांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. यामुळे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय एक आठवडा पुढे गेला आहे.
शहरात घरोघरी ‘व्हायरल फ्लू’
बदलत्या हवामानामुळे सोलापूर जिल्ह्यातील कमाल व किमान तापमानात मोठा फरक पडत आहे. दुपारी ऊन तर रात्री कडाक्याची थंडी पडत आहे. शहरातील कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असून त्याचबरोबर कमाल-किमान तापमानातील घट, ढगाळ हवामान अशा वातावरणामुळे शहरात घरोघरी ‘व्हायरल फ्लू’ने डोके वर काढले आहे. त्यामुळे सध्या खासगी दवाखान्यांपासून ते शासकीय रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभागातही रुग्णांची गर्दी वाढत आहे.
(हेही वाचा वसतिगृहात राहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी खुशखबर!)
शाळांचा निर्णय लांबणीवर
सोलापूर शहरात २० टक्क्यांहून अधिक रुग्णांचे अहवाल सकारात्मक येत आहेत. त्यामुळे शहरातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय एक आठवडा पुढे गेला आहे. सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय महाराष्ट्र शासन पातळीवर घेण्यात आला आहे. असे असले तरी स्थानिक पातळीवर तेथील कोरोना संसर्गाची स्थिती पाहून निर्णय घेण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. पुढील काळात संसर्गाची स्थिती पाहून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय होईल असे स्थानिक प्रशासनाने स्पष्ट केले आहे.