दुकानाबाहेर टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास होणार कारवाई

103

पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानासमोर उघड़्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून त्यामुळे मलेरिया, चिकनगुनीया व डेंग्युताप पसरवणा-या ड़ासांची पैदास आढ़ळून आल्यास अशा दुकानदारांवर दंड़ात्मक कारवाई करण्याचे आदेश ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत.

पावसाळ्यात दरवर्षी टायर पंक्चर्स दुकानांबाहेर उघड़्यावर ठेवलेल्या टायर्समध्ये किंवा दुकानांच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेत टाकलेल्या टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे मलेरीया, चिकनगुनीया तसेच ड़ेंग्युताप पसरवणा-या ड़ासांची पैदास मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळे साथीचे रोग पसरुन शहरातील सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दंडात्मक कारवाई करण्यात येणार 

या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात दुकानदारांनी दुकानाबाहेर उघड़्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये किंवा पाण्याच्या पिंपामध्ये पावसाचे पाणी साचून त्यामध्ये ड़ास-अळी आढ़ळून आल्यास तसेच यामुळे आजुबाजूच्या परिसरात मलेरीया, चिकनगुनीया तसेच ड़ेंग्युतापाचे डास आढ़ळल्यास मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 मधील तरतुदीनुसार संबंधित दुकानदारावर पालिकेच्या आरोग्य विभागाकडून दंड़ात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

( हेही वाचा: राज्यातील वन्यप्राण्यांची गोपनीय माहिती धोक्यात )

काळजी घेण्याच्या सूचना

साथीचे रोग पसरण्याआधीच ठाणे महानगरपालिकेने प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यासाठी सदर सूचना टायर पंक्चर्स दुकानदारांना दिल्या आहेत. शहराचे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी दुकानदारांनी दुकानाबाहेर निकामी टायर्स न ठेवता ते टायर्स एकावर एक रचून ताड़पत्रीने आच्छादीत करुन ठेवावेत किंवा एखाद्या बंदीस्त गोदामात ठेवावेत. त्याचप्रमाणे पंक्चर टेस्टींगसाठी ठेवलेले पाण्याचे टब दर दोन ते तीन दिवसांनी रिकामे करुन सुक्या कपड़्याने कोरड़े करुन पुन्हा भरावे जेणेकरुन त्यामध्ये ड़ास-अळ्यांची पैदास होण्यास अटकाव होईल, अशा सूचनाही पालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील दुकानदारांना देण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.