नेस्को कोविड सेंटरमधील कर्मचा-यांचे आंदोलन! काय आहे कारण?

नवीन जागेत निवासाची व्यवस्था केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरुन काम बंद आंदोलन पुकारले.

130

गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमधील नर्ससह इतर कर्मचाऱ्यांची उन्नत नगर येथील इमारतीतून, संतोष नगर येथील नवीन जागेत निवासाची व्यवस्था केल्याने संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी थेट रस्त्यावर उतरुन काम बंद आंदोलन पुकारले. परंतु अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्या निर्देशानुसार पी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांनी या कर्मचाऱ्यांना जुन्या जागीच राहण्याची मागणी मान्य केल्याने, हे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. पण अचानक आंदोलन पुकारल्याने काही काळ येथील वातावरण भीतीचे बनले, पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

का पुकारले आंदोलन?

गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटर आणि लसीकरण केंद्रातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय तसेच इतर कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था महापालिकेने उन्नत नगर येथील शाळेशेजारी म्हाडाच्या इमारतीमध्ये केली होती. परंतु नेस्को दोनचे लोकार्पण काही दिवसांपूर्वी झाल्यानंतर, येथील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था संतोष नगर येथील इमारतीत करण्यात आली. एका सेंटरसाठी दोन ठिकाणी कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था असल्याने त्यासाठी असणारी कॅटरिंग सेवा, सुरक्षा रक्षक तसेच अन्य प्रकारच्या सुविधांचा खर्च वाढणार असल्याने, महापालिकेने उन्नत नगर इमारतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना संतोष नगर येथील इमारतीत हलवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरोधात कोणालाही कल्पना न देता येथील नर्स व इतर कर्मचारी थेट रस्त्यावर उतरले व त्यांनी कामबंद आंदोलन पुकारले. या घटनेची दखल घेत अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना आहे त्याच ठिकाणी पुन्हा राहण्यास दिले जावे, असे निर्देश दिले. त्यानुसार यशस्वी मध्यस्थी करत महापालिकेचे पी-दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तिथेच राहता येईल, असे मान्य केले. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करत हे कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाले.

महापालिकेने का घेतला निर्णय? 

नेस्कोमधील ६० ते ७० कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था संतोष नगर येथे केलेली आहे. तर पहिल्या टप्प्यातील कोविड सेंटरमधील २०० ते २५० कर्मचारी ज्या ठिकाणी राहत आहेत, ती म्हाडाची लॉटरीमधील इमारत आहे. याबाबत लाभार्थी लोकांनी म्हाडाच्या माध्यमातून महापालिकेला ही इमारत रिक्त करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यातच येथील कर्मचाऱ्यांना संतोषनगर येथे राहण्याची व्यवस्था केल्याने एकाच ठिकाणी सर्वांना राहता यावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला. परंतु त्यांनी अचानक आंदेालन पुकारल्यामुळे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी त्यांना त्याच ठिकाणी राहू द्यावे, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे, असे सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.