महापालिका मुख्यालयासह कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी!

सरकारच्या आदेशांचे पालन करण्यासाठी महापालिका मुख्यालयात तसेच महापालिकेच्या इतर खाते व विभाग कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

मंत्रालयाप्रमाणेच आता मुंबई महापालिका मुख्यालयासह महापालिकेच्या सर्व खाते व विभाग कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना आता प्रवेश बंद करण्यात आला आहे. बाहेरील व्यक्तींना प्रवेश नियंत्रित करण्यासंदर्भात सोमवारी महापालिका आयुक्तांच्या स्वाक्षरीने परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

असे आहेत निर्देश

कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून, सरकारी कार्यालयांमध्ये अभ्यागतांचा प्रवेश नियंत्रित करण्यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी आदेश जारी केले. त्यानुसार त्या आदेशाचे पालन करण्यासाठी महापालिका मुख्यालयात तसेच महापालिकेच्या इतर खाते व विभाग कार्यालयांमध्ये बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आयुक्तांनी जारी केलेल्या या आदेशामध्ये लोकप्रतिनिधी वगळून, तातडीची कामे व बैठकांव्यतिरिक्त अन्य कामांसाठी बाहेरील व्यक्तींना कार्यालयात प्रवेश देऊ नये. तसेच तातडीचे नसेल त्याठिकाणी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे बैठकीचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.

(हेही वाचाः २५ वर्षांवरील सर्वांना लस देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे विनंती!)

कर्मचा-यांना लवकरात लवकर लसीकरण करुन घेण्याचे निर्देश

अपवादात्मक परिस्थितीत जर खातेप्रमुख किंवा विभागप्रमुख यांना बाहेरील व्यक्तींना प्रवेश द्यायचा असल्यास, संबंधित व्यक्तींचा ४८ तासांच्या आतील आरटीपीसीआर अहवाल निगेटिव्ह असल्यास प्रवेश पास देण्यात यावा, असेही निर्देश दिले आहेत. याशिवाय कार्यालयाच्या परिक्षेत्रातील कार्यालयीन कर्मचारी अथवा अधिकारी वगळून, इतर कर्मचारी व अधिकारी यांच्या संबंधित बैठका या ऑनलाइन पध्दतीनेच घेण्यात याव्यात. तसेच महापालिका मुख्यालय व महापालिकेतील इतर खाते व विभागातील कर्मचारी तसेच अधिकारी यांनी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार लवकरात लवकर कोविड लसीकरण करुन घ्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत  .

टपाल सेवा सुविधा प्रवेशद्वाराजवळच

कोविडच्या काळात महापालिका मुख्यालय तसेच विभागीय कार्यालयात दैनंदिन टपाल व इतर महत्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी तसेच विभागीय कार्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे पुन्हा एकदा अशाचप्रकारे टपाल स्वीकारण्याची व्यवस्था कार्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी करण्याचेही निर्देश आुयक्तांनी दिले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here