अंधेरी, मुलुंड क्रीडा संकुलांचे आऊटसोर्सिंग: पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतरही इओआयची प्रक्रिया जोरात

सल्लागार आणि प्रतिष्ठानचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी अभिरुची स्वारस्य अर्जाची(इओआय)प्रक्रिया रद्द करण्याऐवजी ती पुढे राबवली जात आहे.

89

सामान्य मुंबईकराला रास्त आणि माफक दरात सुविधा प्राप्त व्हाव्यात यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानची स्थापना केली होती. या प्रतिष्ठानच्या अधिपत्याखाली मुलुंडमधील कालिदास नाट्यगृह आणि तरण तलावाच्या क्रीडा संकुलाचा तसेच अंधेरीतील शहाजी राजे भोसले क्रीडा संकुलातील तरण तलाव आणि बॅडमिंटन कोर्टचे खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावरुन वातावरण तापलेले असल्याने, राज्याचे पर्यावरण मंत्री आणि पालक मंत्री यांनी याचे खासगीकरण का करावे, याबाबत आयुक्तांना माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. परंतु प्रशासनाकडून अद्यापही या खासगीकरणाबाबत मंत्री महोदयांना माहिती देण्यात आलेली नसून, उलट आपल्या मर्जीतील एका पुण्यातील क्लबची वर्णी कशाप्रकारे लावता येईल यासाठी प्रतिष्ठानने नेमलेले सल्लागार आणि प्रतिष्ठानचे विशेष कार्यकारी अधिकारी यांनी अभिरुची स्वारस्य अर्जाची(इओआय)प्रक्रिया रद्द करण्याऐवजी ती पुढे राबवली जात आहे.

(हेही वाचाः मुंबईतील खड्ड्यांबाबत भाजपाची ही मागणी)

खासगीकरण करण्याचा डाव

मुंबई महापालिकेच्या अंधेरी आणि मुलुंडमधील क्रीडा संकुलातील ज्या सुविधा आणि जागा पडीक स्वरुपात असतील त्यांचे आऊटसोर्सिंग करावे, अशाप्रकारच्या सूचना असतानाही बृहन्मुंबई क्रीडा आणि ललित कला प्रतिष्ठानच्यावतीने नफ्यात चाललेल्या तरण तलावाचे खासगीकरण करण्याचा डाव आहे. प्रतिष्ठानच्यावतीने तरण तलाव खासगी संस्थेला चालवण्यास देत याचे खासगीकरणाच्या दृष्टीकोनात आऊटसोर्सिंग करण्यासाठी अभिरुची स्वारस्य अर्ज अर्थात इओआय जारी करण्यात आला. त्यानुसार या जागांसाठी १५ संस्था तथा क्लब यांनी अर्ज केल्याची माहिती प्राप्त होत आहे.

पर्यावरण मंत्र्यांनी मागवली माहिती

याबाबतचे वृत्त सर्व प्रथम ‘हिंदुस्थान पोस्ट’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर प्रसार माध्यमांतून या खासगीकरणाच्या मुद्द्यावर जोरदार विरोध झाला. याची दखल घेऊन पर्यावरण मंत्री व उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना क्रीडासंकुलांचे आऊटसोर्सिंग का करतोय, याचे सादरीकरण करण्याच्या सूचना केल्या आहेत. हे क्रीडासंकुल महापालिका का चालवू शकत नाही, याची सर्व माहिती सादर करण्याचेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आदित्य ठाकरेंपुढे याचे सादरीकरण केले जाण्याची शक्यता आहे.

(हेही वाचाः कुर्ल्याला ग्रहण : २० दिवसांत अभियंत्याला मारहाण, शिवीगाळ करण्याची चौथी घटना)

पुण्यातील क्लबचा बोलबोला

आदित्य ठाकरे यांनी सादरीकरण करण्याच्या सूचना करताना याच्या जारी करण्यात आलेल्या इओआय तात्पुरत्या स्थगीत करण्यात याव्यात, अशा कोणत्याही सूचना न केल्याने याची प्रक्रिया पुढील कोणतेही विघ्न येण्यापूर्वी प्रतिष्ठानचे विशेष कार्यकारी अधिकारी देवेंद्र कुमार जैन यांनी राबवण्यास सुरुवात केली. सल्लागार आणि प्रतिष्ठानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कल हा पुण्यातील एका क्लबकडे असून, त्यांच्यासाठी हा प्रयत्न असल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत १५ संस्था आणि क्लबने अर्ज भरलेले असून, त्यात पुण्यातील क्लबचा मोठा बोलबोला असल्याची चर्चा क्रीडा संकुलांच्या परिसरात ऐकायला मिळत आहे.

नितेश राणेंचा सवाल

मात्र, याचे आऊटसोर्सिंग झाल्यास येथील १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोक-यांवर गदा येणार असल्याची भीती वर्तवली जात आहे. यासंदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ३ सप्टेंबर रोजी पत्र लिहून नफ्यात चालणाऱ्या तरण तलावांचे खासगीकरण कशासाठी आणि कुणासाठी, असा सवाल करत या तलावांचे पाणी मुरतेय कुठे? असाही प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे हे खासगीकरण त्वरीत थांबवावे अन्यथा आपण प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा दिला होता.

(हेही वाचाः दादरमध्ये ‘सदा’ पुढे आव्हान आदित्यचे!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.