राज्याचा शिक्षणाचा गाडा चालवण्यासाठी जेवढी पदे मंजूर आहेत, त्यातील राज्यपातळीवर ६५ टक्के तर मुंबई विभागात ८५ टक्के पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे शिक्षण विभागाचा कारभार हा प्रभारींच्या जीवावर सुरु असल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचा थेट परिणाम वाढीव शुल्क, प्रवेश इत्यादी बाबतीत पालकांच्या तक्रारी तुंबल्या आहेत, त्यांची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी वर्गच नियुक्त नाही, त्यामुळे शाळांमधील गैरप्रकारांना उधाण आले आहे.
संचालक, उपसंचालक, शिक्षणाधिकारी पदे रिक्त!
राज्यात गट शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी आदी महत्त्वाची पदे तब्बल ६५ टक्क्यांहून अधिक रिक्त आहेत. अशा वेळी नव्या शैक्षणिक वर्षात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचा कारभार चालणार कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राज्यातील शैक्षणिक प्रशासनातील संचालक, उपसंचालक, सहसंचालक, शिक्षणाधिकारी अशी राज्यभरात एकूण ८८५ पदे मंजूर आहेत. त्यापैकी या पदावर सद्यस्थितीत ३०० अधिकारी कार्यरत आहेत. तर तब्बल ५८५ पदे रिक्त आहेत. याशिवाय गटशिक्षणाधिकारी यांची ६६९ पदे आहेत. त्यापैकी केवळ २२७ पदे भरली आहेत. उर्वरित पदे रिक्त आहेत. उप शिक्षणाधिकारी (वर्ग २) पदोन्नतीसाठी पात्र व्यक्तींच्या ३ वर्षांपासून शोध सुरू आहे.
(हेही वाचा : अखेर महापालिकेने स्पुटनिक लस खरेदीचा प्रस्ताव गुंडाळला! )
शिक्षण खात्याचे दुर्लक्ष!
वारंवार मागणी करुनही हा शोध संपलेला नसल्याचे आयुक्त कार्यालय सांगते अशी माहिती पदांची भरती करावी या मागणीचा पाठपुरावा करत असलेल्या मुंबई राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले. शिक्षण आयुक्तालय केवळ माहिती मागवते. मात्र, पदेच भरली जात नाहीत असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग ३ हे पद पदोन्नतीसाठी पात्र असूनही हे पद भरण्यासाठी वेळ काढला जात आहे.
मुंबई वाऱ्यावर!
मुंबईत महापालिका शाळा वगळून १८०४ शाळा आहेत, इथे तब्बल ८५ टक्के पदे रिक्त असल्याने पालका, शिक्षकांच्या तक्रारींवर निर्णय होत नाही. प्रश्न प्रलंबित राहण्याचे प्रमाण वर्षानुवर्ष वाढत आहे.
मुंबईतील रिक्त पदे
मुंबई पश्चिम विभागात १ शिक्षण निरीक्षक पद, ६ उपशिक्षण अधिकाऱ्यांपैकी ५ पदे, सहायक उपनिरीक्षकांच्या ८ पदांपैकी ६ पदे रिक्त आहेत. उत्तर विभागात ६ उपशिक्षण निरीक्षक, ७ सहायक शिक्षण उपनिरीक्षकपदे रिक्त आहेत. दक्षिण विभागात ४ उप शिक्षणाधिकारी, ३ सहायक शिक्षण उपनिरीक्षकपदे रिक्त आहेत. एकूणच उपशिक्षणाधिकारी व सहायक उपशिक्षणाधिकारी यांची ३७ पदे मंजूर असली तरी तब्बल ३१ पदे रिक्त आहेत.
Join Our WhatsApp Community