अखेर ऑक्सफर्डने घेतली दखल!

भाजपचे खासदार अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत रश्मी सामंतच्या छळवणुकीचा मुद्दा मांडताच ऑक्सफर्ड विद्यापीठ खडबडून जागे झाले.  

ब्रिटनमधील जगविख्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रचंड मानसिक छळणुकीला समोरे जावे लागलेल्या रश्मी सामंतला अखेर न्याय मिळेल अशी आशा आहे. कारण या छळवणूक प्रकरणी ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि तेथील स्थानिक पोलीस यांनी चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी सोशल मीडियावर ऑक्सफर्डच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणात टीकाटिप्पणी होत होती. तरीही ऑक्सफर्ड आणि तेथील पोलिसांनी याची दखल घेतली नव्हती, परंतु जेव्हा हे प्रकरण भारतीय संसदेत चर्चेला आले तेव्हा मात्र दखल घेण्यात आली.

संसदेत विषय येताच ऑक्सफर्डला आली जाग! 

भाजपचे खासदार अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत हा विषय उपस्थित केला होता. एका २२ वर्षीय विद्यार्थिनीला ऑक्सफर्डमध्ये भारत द्वेष, हिंदू द्वेषाला समोर जावे लागले, ज्याचा परिणाम म्हणून तेथील विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आलेल्या रश्मी सामंत हिला आठवडाभरात राजीनामा द्यावा लागला, असे वैष्णव म्हणाले होते. खासदार वैष्णव यांच्या संसदेतील भाषणानंतर खऱ्या अर्थाने ब्रिटनने याची दखल घेतली आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ सक्रिय झाले.

मी पुन्हा ऑक्सफर्डमध्ये जाण्याच्या दृष्टीने स्वतःला सुरक्षित समजत नाही. तसेच माझ्यावर झालेल्या अन्याया प्रकरणीही अद्याप विद्यापीठ प्रशासनाने संबंधितांवर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही.
– रश्मी सामंत, विद्यार्थिनी, ऑक्सफर्ड विद्यापीठ

अभिजित सरकारने सुरु केली बदनामी!

जेव्हा रश्मीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली, तेव्हा ऑक्सफर्डचे माजी संशोधक भारतीय मूळ असलेले ब्रिटिश नागरिक डॉ. अभिजित सरकार यांनी रश्मीच्या आई-वडिलांचा ‘जय श्रीराम’ लिहिलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, त्यांच्या तोंडाला काळे फसले आणि रश्मी आणि तिचे पालक यांना मुस्लिम फोबिया झाला असून ते कट्टरवाद आणू इच्छित आहेत, असे म्हटले होते. अशा प्रकारे रश्मीची बदनामी अभिजित सरकारने सुरु केली.

(हेही वाचा : ऑक्सफर्ड विद्यापीठात हिंदुद्वेष, विद्यार्थी नेत्या रश्मी सामंतची मानसिक छळवणूक)

अभिजित सरकारच्या विरोधात तक्रार!   

ग्लोबल हिंदू फेडरेशनचे माजी व्यवस्थापक सतीश शर्मा यांनी अभिजित सरकारच्या विरोधात तक्रार दाखल केली, तसेच रश्मी हिनेही अभिजित सरकारच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलीस आता याचा तपास करत आहेत. ऑक्सफर्डचे प्रवक्ते यावर म्हणाले कि, हिंदू विद्यार्थी आणि शिक्षकांना ऑक्सफर्डमध्ये निश्चित सकारात्मक वातावरण देण्यात येते, त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आमच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या छळवणुकीला सामोरे जावे लागल्यास विद्यापीठ अत्यंत कडक भूमिका घेते, असे म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here