मुंबई महापालिका प्रशासनाने १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मित प्रकल्प(ऑक्सिजन प्लांट) राबवण्याचे काम हाती घेत कामाला सुरुवात केली आहे. या ऑक्सिजन प्लांटचे काम एक महिन्याच्या कालावधीत पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानुसार ही कामे अपेक्षित वेळेत पूर्ण होतील की नाही याबाबत साशंकता निर्माण केली जात असतानाच, हे सर्व प्रकल्प या आठवड्यात कार्यान्वित होतील, असा विश्वास विद्युत व यांत्रिक विभागाने वर्तवला आहे.
हवेतून निर्माण करणार प्राणवायू
मुंबई महापालिका प्रशासनाने प्राणवायू उपलब्धतेबाबत कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून एकूण १२ रुग्णालयांमध्ये मिळून १६ प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे निश्चित केले आहे. यामध्ये वातावरणातील हवेतून प्राणवायू निर्माण करुन तो रुग्णांना पुरवण्यासाठी या प्लांटची निर्मिती केली जात असून, या प्रकल्पांमधून प्रतिदिन एकूण ४३ मेट्रिक टन प्राणवायू साठा निर्माण होणार आहे.
(हेही वाचाः ऑक्सिजन प्लांटसाठी आधी काढल्या निविदा, नंतर उभारले सीएसआर निधीतून!)
९० कोटींचे कंत्राट
मुंबई महापालिकेने दोन वर्षांपूर्वी कस्तुरबा रुग्णालयात प्रतिदिन सुमारे ५०० घनमीटर (क्युबिक मीटर) क्षमतेचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारला आहे. तर जोगेश्वरीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयामध्ये देखील वर्षभरापूर्वी प्रतिदिन १ हजार ७४० घनमीटर (क्युबिक मीटर) क्षमतेचा प्रकल्प उभारला आहे. याच धर्तीवर हे प्रकल्प उभारले जात असून, या १६ प्रकल्पांसाठी मागवलेल्या निविदेमध्ये हायवे कंस्ट्रक्शन कंपनी पात्र ठरली होती. या कंपनीला सुमारे ९० कोटी रुपयांचे कंत्राट बहाल करण्यात आले. मागील महिन्यात याबाबतचा प्रस्ताव मंजूर झाला असून, याचा कार्यादेश १४ जून २०२१ रोजी देण्यात आला. त्यामुळे हे काम पुढील ३० दिवसांमध्ये होणे अपेक्षित आहे. त्यानुसार हे काम पूर्ण होत असल्याची माहिती मिळत आहे.
६० ते ७० टक्के काम पूर्ण
यासंदर्भात यांत्रिक व विद्युत विभागाचे प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी रुग्णालयांमधील ऑक्सिजन प्लांटचे ६० ते ७० टक्के काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. उर्वरित कामे येत्या आठवड्यात पूर्ण होऊन सर्व प्लांट कार्यान्वित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यातील नायरसह अन्य प्लांटची कामे पूर्ण होत आली आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः दक्षिण मुंबईतील ‘या’ कोविड सेंटरमध्ये वाढणार ७०० ऑक्सिजन खाटा)
Join Our WhatsApp Community