मुकेश अंबानी यांच्या गुजरातच्या जामनगर प्लांटमधून महाराष्ट्राला ऑक्सिजन मिळणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रिलायन्स ग्रुपशी चर्चा केली आहे. या चर्चेनंतर महाराष्ट्राला रिलायन्स ग्रुपकडून जवळपास 100 मेट्रिक टन ऑक्सिजनची मदत मिळणार आहे. यासाठी रिलायन्सकडून एकही पैसा घेण्यात येणार नसल्याचे रिलायन्स कडून सांगण्यात आले आहे.
रिलायन्स ग्रुपशी चर्चा
राज्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्यामुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिवीरचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्रात दर दिवसाला बाराशे मेट्रिक टन ऑक्सिजन तयार केला जातो. सध्या राज्यात उत्पादित होणा-या ऑक्सिजनची क्षमता आणि रुग्णालयाला वितरित करणारा ऑक्सिजन तंतोतंत सुरू आहे. त्यामुळे इतर राज्यातून हवाई मार्गाने महाराष्ट्राला ऑक्सिजन पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली. यासोबतच मुकेश अंबानी यांच्या गुजरातच्या जामनगर मध्ये रिलायन्सच्या प्लांटमधून महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन मिळावा, म्हणून मुख्यमंत्र्यांनी रिलायन्स ग्रुपशी चर्चा केल्याची माहिती नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
(हेही वाचाः आता आणखी कडक निर्बंध… काय असू शकतात नवे निर्णय?)
रिलायन्सकडून विनामूल्य ऑक्सिजनचा पुरवठा
मुख्यमंत्र्यांच्या हाकेला मुकेश अंबानी यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. रिलायन्स ग्रुप कडून जवळपास 100 मेट्रिक टन ऑक्सिजन मदत म्हणून दिला जाणार आहे. यासाठी रिलायन्स ग्रुपकडून कोणतीही रक्कम आकारली जाणार नसल्याचं, रिलायन्स ग्रुपच्या जनसंपर्क कर्यालयाकडून सांगण्यात आलं आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांचा रुग्णालयात ऑक्सिजन अभावी मृत्य होत आहे. त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून ही मदत रिलायन्स कडून राज्य सरकरला करण्यात येणार आहे.
एकनाथ शिंदे यांची भेट लिंडे कंपनीला भेट
नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तळोजा येथील लिंडे कंपनीच्या ऑक्सिजन प्लांटला भेट देऊन, या कंपनीच्या कामाचा आढावा घेतला. गेल्या काही दिवसांत ठाण्यासह एमएमआर क्षेत्रातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्यासोबतच पेशंट्सना ऑक्सिजन पुरवण्यासाठी ऑक्सिजनची मागणी देखील प्रचंड वाढली आहे. मागणी आणि पुरवठा यातील तफावत दूर करण्यासाठी नक्की काय करता येईल, याबद्दल चाचपणी केली. यावेळी घेण्यात आलेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी रिलायन्स ग्रुपकडून ऑक्सिजनची मदत महाराष्ट्राला मिळणार असल्याची माहिती दिली.
(हेही वाचाः कोविड महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा! मुख्यमंत्र्यांचे मोदींना पत्र)
वितरणातील अडथळे दूर करण्याचे निर्देश
लिंडे कंपनीकडून सध्या मुंबई, ठाणे,रायगड, पालघर यांच्यासह पुणे, नगर, औरंगाबाद येथेही ऑक्सिजन पुरवठा होत आहे. ही कंपनी सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने २३० मेट्रिक टन ऑक्सिजन जनरेट करत आहे. त्यामुळे या कंपनीतून होणारा ऑक्सिजन पुरवठा आणि त्याचे वितरण सुरळीत व्हावे, तसेच त्यांना येणाऱ्या काही अडचणी तातडीने सोडवण्यात याव्यात, असे निर्देश एकनाथ शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
Join Our WhatsApp Community