पी- उत्तर विभागाला सहायक आयुक्त मिळेना! सर्वाधिक लोकसंख्या असलेला विभाग वाऱ्यावर!

संपूर्ण मुंबईत कोविडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मालाडसारख्या दाटीवाटीने वसलेल्या पी - उत्तर विभागाला मागील चार महिन्यांपासून जबाबदार सहायक आयुक्त मिळत नाही.

मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयांपैकी सर्वात मोठा प्रशासकीय विभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालाडच्या पी- उत्तर विभागाचे दोन भाग करून त्यासाठी स्वतंत्र सहायक आयुक्त नेमण्याची घोषणा महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केली. परंतु महापालिकेच्या अर्थसंकल्पात घोषणा करूनही चहल यांना पी- उत्तर विभागाचे पी – पूर्व व पी- पश्चिम असे दोन भाग करता आले नाही. तसेच सध्या असलेल्या पी-उत्तर विभागाला मागील चार महिन्यांत स्वतंत्र आणि कायमस्वरुपी असा सहायक आयुक्त कोविडच्या या परिस्थितीतही नेमता न आल्याने भविष्यात तेथील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर आयुक्त नेमणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पी – उत्तर, दक्षिण दोन्ही विभागांची जबाबदारी एकाच अधिकाऱ्याकडे!

मुंबई महापालिकेच्या पी – दक्षिण विभागातील सहायक आयुक्त असलेल्या देवीदास क्षीरसागर यांना बढती मिळाल्यानंतर या रिक्त जागी ऑक्टोबर महिन्यात विक्रोळी-भांडुप या एस विभागाचे तत्कालिन सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांची बदली झाली. तर एस विभागाच्या सहायक आयुक्तपदाची जबाबदारी आचरेकर यांच्याकडे सापेवण्यात आली. परंतु त्यानंतर पी – उत्तर विभागाचे सहायक आयुक्त असलेले संजोग कबरे यांनाही उपायुक्तपदी बढती मिळाली. त्यामुळे या रिक्त जागी इतर सहायक आयुक्ताची बदली करण्याऐवजी पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त संतोषकुमार धोंडे यांच्याकडे पी – उत्तर विभागाचा प्रभारी पदभार सोपवला. त्यामुळे पी – उत्तर व पी – दक्षिण अशा दोन्ही विभागांची जबाबदारी सध्या एक सहायक आयुक्त सांभाळत आहेत.

मागील चार महिन्यांपासून विभागाला सहायक आयुक्त नाही!

मागील डिसेंबर महिन्यापासून दोन विभागांची जबाबदारी एक सहायक आयुक्त सांभाळत असतानाच ५ फेब्रुवारी रोजी अर्थसकल्प मांडताना आयुक्तांनी पी – उत्तर विभागाचे दोन भाग करून पी पूर्व व पी दक्षिण असे दोन स्वतंत्र विभाग केले जाणार असल्याची घोषणा केली. पी – उत्तर विभाग हा मोठा विभाग असून मोठ्या संख्येने लोकसंख्या असलेला आहे. या विभागासाठी आजवर स्वतंत्र सहायक आयुक्त असताना याच मोठ्या प्रभागाची जबाबदारी प्रभारी म्हणून पी- दक्षिण विभागाच्या सहायक आयुक्तांवर साोपवली आहे आणि मागील चार महिन्यांपासून या विभागाला जबाबदार सहायक आयुक्तच मिळत नाही. एका बाजुला संपूर्ण मुंबईत कोविडच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच मालाडसारखा दाटीवाटीने वसलेल्या लोकसंख्येचा भाग असलेल्या पी – उत्तरमध्ये कधी कशा प्रकारे हा आजार पसरेल याचा नेम नाही. पण असे असताना आयुक्तांचे या विभागाकडे लक्ष नसून खुद्द आयुक्तच यासाठी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मालाडचे आमदार अस्लम शेख हे असून ते स्वत: पालकमंत्री आहेत. तरीही ते प्रतिनिधीत्व करणाऱ्या मालाडला स्वतंत्र सहायक आयुक्त मिळत नाही. त्यामुळे शेख यांच्यामुळेच कायमस्वरुपी सहायक आयुक्त नेमण्यात विलंब केला जात आहे का, असा सवाल केला जात आहे.

(हेही वाचा : बापरे! तब्बल ४ वर्षांपासून सुरु आहे महापालिका शाळांची दुरुस्ती! )

विभागाकडे महापालिकेचे दुर्लक्ष

जी -दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे यांच्याकडे सध्याही माहिती व तंत्रज्ञान विभागाची जबाबदारी असून विभागातील व्यस्त कामकाजामुळे त्यांचा या विभागाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे उघडे यांच्यावरील ‘आयटी’ विभागाचा भार हलका करण्याची मागणी नगरसेवकांकडून होत आहे. यापूर्वी ‘डि’ विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्याकडे  ‘ई’ विभागाचा प्रभारी भार सोपवण्यात आला होता. पण त्यानंतर मकरंद दगडखैरे यांची नेमणूक करण्यात अल्यानंतर त्यांच्यावरील भार हलका झाला होता. परंतु मालाडच्या पी- उत्तर विभागासाठी सहायक आयुक्त नसणे म्हणजे त्या विभागातील जनतेच्या सेवा सुविधांबाबत प्रशासन गंभीर नसल्याचेच स्पष्ट होत आहे. मात्र, दुसरीकडे तारेवरची कसरत करत धोंडे यांनी या दोन्ही विभागांमध्ये कार्यरत राहून कुठेही कमी पडू न देण्याचा प्रयत्न केल्याचेही दिसून येत आहे.

परिणामी नगरसेवक जनतेच्या रोषाचे ठरतात कारण!

एका बाजुला सहायक आयुक्तांवर दोन विभागांची जबाबदारी असताना दुसरीकडे उपायुक्तांकडेही अशाच जबाबदारी सोपवण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळणाऱ्या देवीदास क्षीरसागर यांच्याकडे परिमंडळ सहा उपायुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. कोविडसारख्या आजारांमध्ये आरोग्य विभागाची जबाबदारी महत्वपूर्ण असताना त्यांना परिमंडळाची जबाबदारी सोपवून व्यस्त ठेवले जात आहे. त्यामुळे अशा उपायुक्तांनी नक्की कोणत्या विभागाला न्याय द्यायचा, असा प्रश्न उपस्थित होतो. परिणामी उपायुक्त वेळ देत नसल्याने ते नगरसेवक व जनतेच्या रोषाचे धनी होताना दिसत असतात.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here