पाकिस्तानातील सिंध प्रांतातील कशमोर येथे रविवारी सकाळी एका हिंदू मंदिरावर रॉकेट लाँचरने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी मंदिर आणि परिसरातील हिंदू समाजाच्या घरांवरही अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकून पोलीस घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत हल्लेखोर पळून गेले. पाकिस्तानमधील हिंदू मंदिरात 48 तासांत तोडफोड करण्याची ही दुसरी घटना आहे. याआधी शुक्रवारी रात्री कराचीमध्ये 150 वर्षे जुने हिंदू मंदिर पाडण्यात आले होते. रात्री मारी माता मंदिरावर बुलडोझर चालवण्यात आल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यावेळी परिसरात वीज नव्हती.
हल्ल्याच्या वेळी मंदिर बंद होते
पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, रविवारच्या हल्ल्यावेळी मंदिर बंद होते, त्यामुळे फारसे नुकसान झाले नाही. हल्लेखोरांनी मंदिराशेजारी राहणाऱ्या हिंदू समाजाच्या लोकांच्या घरांवरही हल्ला केला. प्राथमिक तपासानुसार हल्लेखोर 8 ते 9 जण होते. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. बागडी समुदायाने आयोजित केलेल्या धार्मिक सेवांसाठी मंदिर दरवर्षी उघडले जाते, असे डॉनने वृत्त दिले आहे.
(हेही वाचा Maharashtra assembly session : फडणवीसांनी उडवली विरोधकांच्या पत्राची खिल्ली; म्हणाले… )
शुक्रवारी रात्री मारी माता मंदिरावर बुलडोझर
कराचीच्या लोकांनी सांगितले- शुक्रवारी रात्री काही लोकांनी बुलडोझर आणले आणि मारी माता मंदिराच्या बाहेरील भिंती आणि मुख्य दरवाजा वगळता संपूर्ण मंदिर आतून नष्ट केले. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तानुसार, जेव्हा मंदिर पाडले जात होते, तेव्हा मंदिर नष्ट करणाऱ्यांना सुरक्षा देण्यासाठी पोलिस तैनात करण्यात आले होते.
2022 मध्येही मूर्तींची तोडफोड करण्यात आली होती
मुखी चोहितराम रोडवर हे मारी माता मंदिर आहे. तेथून सोल्जर बाजार पोलिस स्टेशनही हाकेच्या अंतरावर आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंदिराची जमीन एका शॉपिंग प्लाझा प्रवर्तकाला 7 कोटी रुपयांना विकण्यात आली आहे. त्यामुळेच मंदिर पाडण्यात आले. जून 2022 मध्येही मारी माता मंदिरातील देवतांच्या मूर्ती फोडण्यात आल्या होत्या.
Join Our WhatsApp Community