पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणी कासा पोलीस स्टेशनचे तत्कालीन प्रभारी अधिकारी आनंदराव काळे यांना पोलीस विभागातून बडतर्फ करण्यात आले आहे. तर पोलीस उपनिरीक्षक कटारे यांना वेतन श्रेणीतील मूळ वेतनावर २ वर्षे ठेवण्यात आले असून, सहा. फौजदार साळुंखे यांना सेवेतून सक्तीने सेवानिवृत्ती देण्यात आली आहे. पालघर घटनेवेळी या अधिकाऱ्यांनी कर्तव्य न बजावल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. १६ एप्रिल २०२० च्या रात्री झालेल्या या हत्याकांडात मुंबईहून सुरतकडे निघालेल्या दोन साधू व त्यांच्या वाहन चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी प्रथम कारवाईत कासा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आनंदराव काळे, उपनिरीक्षक सुधीर कटारे, सहाय्यक फौजदार रवी साळुंखे व दोन कॉन्स्टेबल यांना यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. तर पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. हे प्रकरण घडल्यानंतर कासा पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या ३५ पोलीस कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली होती.
सीबीआय चौकशीची मागणी
सगळ्यात महत्वाचे म्हणजे पालघरमध्ये झालेल्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने काही दिवसापूर्वी केली होती. पालघरमध्ये एक सुनियोजित कटासहीत दोन साधू आणि त्यांच्या वाहन चालकाची हत्या करण्यात आली होती. ज्या जागेवर या हत्या घडवून आणण्यात आल्या. तिथे ख्रिश्चन मिशनरीज सक्रीय आहेत. त्यांच्याच इशाऱ्यावर निर्दोष साधुंची हत्या करण्यात आली, असा दावा विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी केला होता. ‘महाराष्ट्र पोलिसांनी या प्रकरणात काहींना अटक केली असली तर हत्येचा कट रचणाऱ्या खऱ्याखुऱ्या खुन्यांचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे आणि हे सीबीआय चौकशीमुळे शक्य होईल’ असेही बन्सल म्हणाले होते. तर अखिल भारतीय आखाडा परिषदेने पालघरमध्ये झालेल्या हत्या प्रकरणात सीबीआय चौकशीसाठी एक प्रस्ताव पारित केला जाईल आणि गरज लागलीच तर आखाडा परिषदेद्वारे कोर्टाचा दरवाजाही ठोठावला जाईल असे सांगितले होते.
Join Our WhatsApp Community