खासगी कंपन्यांमधील सर्व कामगारांना सुरक्षितता प्रशिक्षण बंधनकारक

पालघर परिसरातील खासगी कंपन्यांमधील सर्व कामगारांना सुरक्षितता प्रशिक्षण बंधनकारक केले जाणार असल्याची माहिती पालघरचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
वसईच्या जूचंद्रपाडा येथे कॉस पॉवर कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीमध्ये तीन कामगारांचा मृत्यू झाला असून, सात जण जखमी झाले आहेत. या घटनेचे वृत समजताच पालकमंत्री चव्हाण यांनी तातडीने रात्री घटनास्थळी धाव घेतली व दुर्घटनास्थळाची पाहणी केली. तसेच ऑर्बिट रुग्णालयाला भेट देऊन जखमींची विचारपूस केली. जखमींवर तातडीने वैदयकीय उपचार करण्याच्या सूचना त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिल्या.
तसेच येत्या काळात या परिसरातील कंपन्यांमधील सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षितता प्रशिक्षण बंधनकारक करण्यासाठी कंपन्यांचे मालक आणि संचालक यांना आवश्यक निर्देश देण्यात येतील. त्याचप्रमाणे भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी सर्व योग्य उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी स्थानिक प्रशासनाला दिले.

मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत

  • अशा दुर्घटना टाळण्यासाठी कंपन्याचे मालक, संचालकांनी सुरक्षिततेचे निकष पाळणे गरजेचे आहे. कामगारांना सुरक्षितताच्या दृष्टीने योग्य प्रशिक्षण देणे, कामामध्ये तांत्रिक चुका टाळण्याच्या दृष्टीने त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.
  • तसेच जे नवीन कामगार कंत्राटी वा रोजंदारी स्वरुपात कंपन्यांमध्ये कामाला येतात त्यांनाही जुन्या कामगारांनाप्रमाणे सुरक्षितता प्रशिक्षण देण्याचे निर्देशही कंपन्यांच्या मालकांना देण्यात येतील, असेही रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले.
  • कंपनीच्या मालकांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचे आश्वासन दिले आहे. परंतु राज्य सरकार म्हणून या दुर्घटनेकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून आर्थिक मदत देण्यात येईल. त्याप्रमाणे जखमींच्या उपचारासाठी लागणारी सर्व मदतही देण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here