बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण देशभरात येत्या बुधवारी, 30 ऑगस्ट रोजी होत आहे. राखी पौर्णिमा जवळ आल्यानंतर राखी बांधण्यासाठी नक्की काय मुहूर्त आहे, याची चर्चा सर्वत्र सुरू होते याबाबत दाते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी माहिती दिली आहे.
राखी पौर्णिमेच्या पारंपरिक सणाबाबत पंचांगकर्ते मोहन दाते म्हणाले की, भावाच्या हातावर राखी बांधण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची आवश्यकता नाही. रक्षाबंधन हा सण विवाह, मुंज किंवा वास्तूशांत याप्रमाणे मंगल कार्य नसून सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव आहे. त्यामुल भद्रा काल असला, तरी दिवसभरात आपल्या सोयीने भाऊ-बहीण केव्हाही रक्षाबंधन साजरे करू शकतात.
विधिवत साजरे करण्यासाठी…
राखीपौर्णिमा हा सण बहीण-भाऊ, मित्र, समाजबांधव यांच्यातील सामाजिक सलोखा राखणारा उत्सव असल्याने तो मोठ्या उत्साहाने साजरा करावा, असे सांगताना ते म्हणाले की, पूर्वीच्या काळी रक्षाहोमाद्वारे रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे, अशा पद्धतीने विधिवत रक्षाबंधन करण्यासाठी त्यांनी भद्राकाल म्हणजेच रात्री 9 वाजून 2 मिनिटांनी रक्षाबंधन साजरे करावे, असेही सांगितले आहे.